Belhe : पावसाअभावी खरीप पिके धोक्यात
Belhe : खरीप हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. सुरुवातीला पिकांची उगवणही चांगली झाली होती.

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील शिंदेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीन, मका, बाजरी, मूग, उडीद यांसह विविध पिके सुकून करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. सुरुवातीला पिकांची उगवणही चांगली झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नाही. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पिकांची वाढ खुंटली असून, अनेक शेतांमध्ये पिकांची पाने पिवळी पडून वाळू लागली आहेत.
खरीप पिकांच्या लागवडीसाठी शेतकर्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, आता पावसाने पाठ फिरवल्याने केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने यंदाचे पीक चांगले येईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार बियाणे, खते आणि मशागतीवर मोठा खर्च केला. आता मात्र पाऊस नसल्याने सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत सुकत आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर संपूर्ण पीक हातातून जाण्याची शक्यता आहे.
-एम. डी. पाटील शिंदे, माजी सरपंच शिंदेवाडीसोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून, सध्या फुलोरा आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतानाच पिके सुकू लागली आहेत. आणेपठार भागातील जमीन हलक्या प्रतीची असल्याने पावसाचा खंड पडल्यास पिकांवर त्याचा मोठा परिणाम होतो. शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे सुरू करावेत आणि परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आवश्यक मदत करावी.
-रोहिदास शिंदे, प्रगतिशील शेतकरी शिंदेवाडी





