Kharadi Murder Case – मध्यरात्रीच्यावेळी दोन सुरक्षारक्षकांमध्ये झोपण्याच्या कारणातून झालेल्या वादात, एकाने दुसऱ्याचा गमचाने गळा आवळून खून केला. त्यानंतर खून करणाऱ्यानेच पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची ही माहिती दिली. पांडुरंग भाऊराव खारवणे (५२, रा. म्हसोबा वस्ती मांजरी) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तर याप्रकरणी, खराडी पोलिसांनी सुदर्शन माणिक काळे (२२, रा. तुळजाभवानीनगर खराडी) आला अटक केली आहे. याबाबत पांडुरंग यांचा मुलगा बाळू (३०) याने फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी (दि.१३) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास स्पॅनोलाईफ सोसायटी, स्विट इंडिया चौक, खराडी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुदर्शन काळे आणि खून झालेली व्यक्ती पांडुरंग खारवणे हे दोघे खराडी येथील स्पॅनोलाईफ सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. सोमवारी पहाटेच्या वेळी दोघांत झोपण्याच्या कारणातून वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, काळे याने खारवणे यांच्या डोक्याला बांधलेला गमचा घेऊन त्यांचा गळा आवळला. त्यामध्ये पांडुरंग यांचा जागीच मृत्यू झाला. थोड्यावेळाने भानावर आलेल्या काळे याने आपण काय कृत्य केले याची त्याला कल्पना आली. त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सोमय मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सहायबा पोटे करीत आहेत.