प्रभात वृत्तसेवा पुणे – खराडी येथील हॉटेलमधील कथित अमली पदार्थ पार्टीत आरोपी डॉ. प्रांजल खेवलकरला विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी जामीन दिला आहे. यामुळे दोन महिन्यांपासून कोठडीत असलेल्या खेवलकरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जामिनावर सुटका होणार आहे.खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. खेवलकरने अॅड.पुष्कर दुर्गे आणि अॅड. हृषीकेश गानू यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याच प्रकरणात प्राची शर्मा हिलाही जामीन मिळाला आहे. तिने अॅड. राजू लक्ष्मणराव मते आणि अॅड. श्रीनाथ राजू मते यांच्यामार्फत अर्ज केला होता. खराडीतील हॉटेल स्टेबर्डमधील एका खोलीत २७ जुलै रोजी सुरू असलेल्या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. डॉ. खेवलकर याच्यासह सातजणांना अटक केली. आरोपींकडून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा, हुक्का सेट, दारूच्या बाटल्या, दोन वाहने असा मुद्देमाल आढळला. विशेष न्यायालयाने तपास अधिकारी, सरकारी वकील व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत खेवलकरला जामीन मंजूर केला. या प्रकरणात सर्वांविरूद्ध आरोपपत्र दाखल झाले आहे.