“शरद पवारांना सोडून गेलेले खंडोजी खोपडे”-माजी आमदार जगन्नाथ शेवाळे

मंचर येथे राष्ट्रवादीची कार्यकर्ता बैठक
मंचर – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून काही नेते भाजपला जाऊन मिळाले आहेत. तिकडे गेलेले सर्व खंडोजी खोपडे असून, आपल्याकडे सर्व मर्द मावळे आहेत. पुढील काळात आपल्याला कार्यकर्त्यांची संघटना मजबूत करायची आहे. संघटना मजबूत असल्यास विजय नक्कीच मिळेल, असे मत माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी गुरुवार (दि. 14) व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता बैठक प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, स्वप्निल गायकवाड, उद्योजक किसनराव ऊडे ,गुलाबराव धुमाळ, दामूअण्णा घोडे, गोपाळराव गवारी, गणेश यादव, दादाभाऊ थोरात, धोंडीभाऊ भोर, कारभारी भोर, संदीप निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जगन्नाथ शेवाळे म्हणाले, आंबेगाव तालुक्याचा कारभार नाहीतर कारभारी चुकला असून, राज्याचे, देशाचे कारभारीही चुकले आहेत. ते बदलण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवरील सर्व भाजप विरोधी नेत्यांना एकत्र करून भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी तयार झाली आहे. आपल्याला देखील स्थानिक पातळीवर एकत्र घेऊन काम करायचे आहे. पक्षाचा पुढील कार्यक्रम तीन टप्प्यात होणार असून, लवकरच पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती होणार आहेत. प्रत्येक तालुका, गाव पातळीवर बैठका घेऊन बूथ प्रमुख, बूथ निरीक्षकांच्या नेमणुका करून आढाव घेतला जाणार आहे.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम म्हणाले, राज्यात आजपर्यंत झालेल्या निवडणुका व देशाच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. आंबेगाव शिरूर मतदार संघात शरद पवार यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. भीमाशंकर साखर कारखाना, डिंभे धरण उभे करण्यात त्यांचे योगदान आहे. भाजप सरकार जनतेच्या विरोधात निर्णय घेत असून सहकार मंत्री वळसे पाटील यांनी त्यांना जाब विचारणे गरजेचे आहे.
सहकार मंत्र्यांनी सरकारला जाब विचारावा
कांद्याचे बाजार भाव वाढले असताना शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे कांद्याचे बाजार भाव पडले आहेत. दोन ते अडीच हजार रुपये टोमॅटोचे बाजार भाव वाढले असताना केंद्र सरकारने टोमॅटोचे बाजार भाव पाडण्याचे काम केले. याबाबत वळसे पाटील यांनी सरकारला जाब विचारणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून जिल्ह्यातील इतर कारखान्यापेक्षा जास्त दर कसा देता येईल या विषयी येणाऱ्या वार्षिक सभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे देवदत्त निकम यांनी सांगितले.
शरद पवार यांची आंबेगाव तालुक्यातील सभेची तारीख ठरल्यास गावागावांत, वाडीवस्तीवर जाऊन कार्यकर्त्यांची फौज उभी करू आतापर्यंत झाली नसेल अशी भव्य सभा आंबेगाव तालुक्यात घेऊ.
– देवदत्त निकम, माजी अध्यक्ष भीमाशंकर साखर कारखाना





