ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे प्रभारी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचे पुत्र तारीक रहमान यांनी आपण बांगलादेशात परतणार असल्याचे जाहीर केले आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण भाग घेणार असल्याचेही रहमान यांनी म्हटले आहे. तारीक रहमान गेल्या २६ वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. काही कारणांमुळे आपण बांगलादेशात परत येऊ शकलो नव्हतो. मात्र आता परत येण्याची वेळ आली आहे. आणि आता मी परत येणार आहे, असे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. जर बीएनपीने सरकार स्थापन केले तर पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे का असे विचारले असता त्याबाबतचा निर्णय जनताच घेईल, असेही रहमान म्हणाले. तारीक रहमान यांना २००८ सालच्या तत्कालिन लष्करी नेतृत्वाखालील हंगामी सरकारने वैद्यकीय उपचारांसाठी लंडनला जाण्याची परवानगी दिली होती. तेंव्हापासून रहमान लंडनमध्येच आहेत. त्यांना बांगलादेशला परत आणण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न केले जात होते. रहमान यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे आणि भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आवामी लीग सरकारच्या काळात शिक्षा टाळण्यासाठी रहमान लंडनमध्येच वास्तव्यास होते. २००४ मध्ये तत्कालिन विरोधी नेत्या शेख हसीना यांच्यावर ग्रेनेड हल्ला करण्याच्या कटाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोपही रहमान यांच्यावर आहे. बीएनपीच्या माजी पंतप्रधान खालेदा झिया या ८० वर्षांच्या असून त्या अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यामुळे फेब्रुवारीमधील निवडणुका त्या लढवतील का नाही, याबद्दल संभ्रम आहे. त्यांच्याऐवजी तारीक रहमान बीएनपीच्या प्रमुख नेत्याच्या रुपात निवडणूक लढवू शकतील, असा अंदाज आहे.