ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा खालिदा झिया यांची बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. झिया चॅरिटेबल ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार केल्याबद्दल खालिदा झिया यांना शेख हसीना यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात, २०१८ मध्ये ढाका न्यायालयाने दोषी ठरवले होते. या प्रकरणात झिया यांना न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली होती. झिया यांना १० लाख टका इतका दंडही ठोठावण्यात आला होता. मात्र झिया यांच्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा हा निर्णय रद्द ठरवला. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींना देखील उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. तेजगांव पोलीस ठाण्यात २०११ साली भ्रष्टाचार विरोधी आयोगाने हे प्रकरण दाखल केले होते. खालिदा झिया आणि अन्य तिघांनी सत्तेचा दुरुपयोग करून ट्रस्टसाठी काही अज्ञात स्रोतातून गैरमार्गाने निधी जमवला असल्याचा आरोप करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने झिया अनाथगृह ट्रस्टमधील भ्रष्टाचार प्रकरणी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर झिया यांना ८ फेब्रुवारी २०१८ रोजी ढाका येथील तुरुंगात टाकण्यात आले होते. ३० ऑक्टोबर २०१८ रोजी उच्च न्यायालयाने झिया यांची शिक्षा १० वर्षांपर्यंत वाढवली होती. त्यानंतर झिया यांना झिया टॅरिटेबल ट्रस्टमधील भ्रष्टाचारातही दोषी ठरवले गेले होते. कोविड साथीच्या काळात त्यांची तुरुंगातून तात्पुरती सुटका केली गेली होती आणि निवासस्थानीच स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र बांगलादेशात ऑगस्ट महिन्यात सत्तांतर झाल्यावर त्यांना नजरकैदेतूनही मुक्त करण्यात आले होते.