खालापूर – राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने निवडणूक विभागात शांतता होती. युती, आघाडी आणि पक्षांतर्गत तिकीटवाटपाच्या चर्चेमुळे इच्छुक उमेदवार संभ्रमावस्थेत असून, अर्ज दाखल प्रक्रियेवर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला आहे. खोपोली नगरपरिषदेच्या १५ प्रभागांमधील ३१ जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली आहे. सोमवारी (दि. १०) सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, १७ नोव्हेंबर दुपारी पर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करण्याची मुदत आहे. मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. खोपोलीत विविध राजकीय पक्षांत तिकीटवाटपाबाबत मोठी अनिश्चितता असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ओबीसी महिला आरक्षण असलेल्या प्रभागांमध्ये योग्य उमेदवारांच्या शोधात आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेत ओबीसी महिला इच्छुकांची गर्दी झाल्याने नाराजीचे वातावरण आहे. भाजप पक्षाकडून वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांना वेग आला आहे, मात्र अजित पवार गटासोबत जाणार की स्वतंत्र लढणार, याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. इच्छुक उमेदवारांची संभ्रमावस्था सध्या प्रत्येक पक्षात तिकीटवाटपासाठी अंतर्गत चर्चा सुरू आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये प्रचार सुरू केला असला, तरी अंतिम उमेदवार निवड होईपर्यंत कुणीही अर्ज दाखल करण्यास पुढे येत नाही. विशेषतः ओबीसी महिला आरक्षण असलेल्या प्रभागांमध्ये अजूनही उमेदवार निश्चित नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. काही इच्छुकांनी दुसऱ्या प्रभागातून अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. राजकीय वर्तुळात चर्चांचा उधाण पहिल्याच दिवशी अर्ज दाखल न होण्याच्या घटनेमुळे खोपोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चांचा उधाण आले आहे. युती आणि आघाडीचे गणित ठरल्याशिवाय उमेदवार अर्ज दाखल करणार नसल्याचेही बोलले जात आहे. काही ठिकाणी उमेदवार पक्षांतर्गत मतभेद आणि नेतृत्वाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेचा पहिला दिवस पूर्णपणे शांततेत गेला. पुढील काही दिवसांत गती येण्याची शक्यता बहुतांश उमेदवार शुभमुहूर्त, पक्षाची अधिकृत घोषणा आणि अंतर्गत चर्चांचे निकाल यांची वाट पाहतात. साधारणपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून होते. त्यामुळे पुढील काही दिवसांत खोपोलीत अर्ज दाखल प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.