प्रभात वृत्तसेवा खालापूर – खालापूर पोलिसांनी ६३ लाख ३४ हजार २०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ट्रकसह एकूण १ कोटी ३ लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती खालापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावरोली टोलनाक्याजवळ कंटेनर क्रमांक (एमएच ४० डीसी २२६५) थांबवून तपासणी करण्यात आली. या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित पान मसाला व तंबाखूयुक्त गुटखा अवैधरित्या वाहून नेण्यात येत असल्याचे उघडकीस आले.तपासणीदरम्यान कंटेनरवरील सील तुटलेले आढळले. चालकाकडे मालवाहतुकीचे कोणतेही वैध कागदपत्र अथवा अधिकृत पावती नसल्याने संशय बळावला. त्यानंतर कंटेनर पोलीस ठाण्यात आणून अन्न व औषध प्रशासन विभाग, रायगड (पेण) यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. यावेळी शेख रशीद शेख रहमान (रा. शरीफ नगर, अकोला) आणि गणेश वानखेडे (रा. हरिहरपेठ, गाडगेनगर, अकोला) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सोबतच ६३.३४ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा तसेच ४० लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील, उपनिरीक्षक नितीन सांगले व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.