पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याने तब्बल दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी ४६ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवर कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी संताप व्यक्त केला. सरकार आणि पोलीस आयुक्तांना इशारा दिला आहे की, “खाकी वर्दीच भ्रष्टाचारात बुडालेली असेल, तर न्याय कोणाकडे मागायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत बोलताना डॉ. कांबळे म्हणाले की, आरोपी उपनिरीक्षक चिंतामणी याच्या घरातही मोठे घबाड सापडले असून त्यामध्ये रोख रक्कम, दागिने आणि मालमत्तेचाही समावेश आहे. भ्रष्टाचारामुळे जनतेचा शासन आणि व्यवस्थेवरील विश्वास संपत चालला आहे. सरकारने आणि पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. त्यांनी भ्रष्टाचारविरोधी तक्रार निवारण प्रणाली, नियमित तपासणी आणि नागरिक संवाद वाढवण्याची मागणी केली आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा इशारा डॉ. कांबळे यांनी दिला.