कळस : खडकवासला कालव्याचे आवर्तन न मिळाल्यामुळे येत्या सोमवारी (दि. २५) पुणे येथील खडकवासला पाटबंधारे विभाग, ‘सिंचन भवन’ कार्यालयासमोर तीव्र धरणे व बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भातील निवेदन प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहिती खडकवासला कालवा संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. गत ७ मे रोजी आंदोलकांना दिलेल्या लेखी पत्राद्वारे प्रशासनाने १२ मे पासून इंदापूर तालुक्याला कालव्याचे पाणी देण्याचे मान्य केले होते. मात्र, आश्वासन देऊनही अद्याप इंदापूर तालुक्यातील सुमारे ३६ गावांना पाणी उपलब्ध झालेले नाही. जलसंपदा विभागाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, त्यांच्यात तीव्र संताप आहे. जोपर्यंत इंदापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत सिंचन भवनसमोरील आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, समर्थ पोलीस ठाणे आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना देण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकरी कार्यालयासमोरून हटणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच, या आंदोलनादरम्यान संतप्त शेतकरी जमावाकडून काही अनुचित प्रकार घडल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी जलसंपदा विभागाची राहील, असेही समितीने स्पष्ट केले आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या इंदापूर तालुक्यासाठी तत्काळ पाणी सोडण्याचे नियोजन करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवावे. जानाई-शिरसाई’ योजनेला सध्या बेकायदेशीरपणे सुरू असलेले पाणी बंद करावे; कारण फेब्रुवारीनंतर या योजनेला पाणी देण्याची कोणतीही तरतूद नाही.’जानाई-शिरसाई’चा अर्धा टीएमसी वाढीव कोटा रद्द करण्यात यावा. मूळ सिंचन आराखड्यातील तरतुदीनुसार इंदापूर तालुक्याला शेतीसाठी ‘टेल-टू-हेड’ या नियमाप्रमाणे बारमाही पाणी उपलब्ध करून द्यावे. हेही वाचा : Pune District : आठवडे बाजार जलमय, घरात गटारीचे पाणी