मुंबई – KGF स्टार यशची लोकप्रियता केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदी पट्ट्यातही आहे. त्याचे केजीएफ हे दोन्ही चित्रपट लोकांना खूप आवडले आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा त्याला विचारण्यात आले की तुला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल, तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न लावता पूर्ण प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर दिले.
यशने यावेळी घेतलेलं नाव ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं कारण यात ना खान ब्रँडचा कोणी अभिनेता होता ना बिग बी, संवादादरम्यान यशने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान, जेव्हा त्याला विचारण्यात आले की तुला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल? यावर यशने नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव घेतले. ‘मला नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करायला आवडेल. तो एक उत्तम अभिनेता आहे.असं यश यावेळी म्हणाला.
नवाजुद्दीनची गणना बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून आपली क्षमता सिद्ध केली आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फ्रेंचाइजी, ‘रमन राघव 2.0’, ‘मॉम’, ‘मंटो’ हे त्यांचे दर्जेदार चित्रपट आहेत. त्याने ‘मॅकमाफिया’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ सारख्या वेब-सिरीजमध्येही काम केले आहे.
यशसाठी हे वर्ष खूप चांगले गेले. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘KGF: Chapter 2’ या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने केवळ देशांतर्गत बाजारात 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. याशिवाय या चित्रपटाने परदेशातही बंपर कमाई केली.