Kevin Warsh: अमेरिकेची केंद्रीय बँक ‘फेडरल रिझर्व्ह’च्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांनी शुक्रवारी अधिकृतपणे शपथ घेतली. त्यांनी जेरोम पॉवेल यांची जागा घेत फेडरल रिझर्व्हची सूत्रे हाती घेतली. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या विशेष समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती क्लेरेन्स थॉमस यांनी त्यांना पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर वॉर्श यांनी “ही शपथ स्वीकारताना मी एक मोठी आणि गंभीर जबाबदारी स्वीकारली आहे,” असे सांगत फेडरल रिझर्व्हला “सुधारणा-केंद्रित” संस्थेच्या दिशेने नेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी पुढे म्हटले की, “भूतकाळातील यश आणि चुका यांमधून शिकत, जुनाट चौकटी आणि मॉडेल्समधून बाहेर पडत आम्ही अधिक पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेवर भर देऊ.” महागाई नियंत्रण, आर्थिक वाढ आणि अमेरिकन नागरिकांचे प्रत्यक्ष उत्पन्न वाढविणे हीच आपली प्रमुख उद्दिष्टे असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “केंद्रीय बँकांनी शहाणपण, स्पष्टता, स्वायत्तता आणि ठाम भूमिकेसह काम केल्यास महागाई कमी, विकास अधिक मजबूत आणि अमेरिकेची समृद्धी वाढू शकते,” असे वॉर्श म्हणाले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉर्श यांना पूर्ण स्वायत्ततेने काम करण्याचा सल्ला दिला. “केविन यांनी कोणाच्याही दबावाखाली न राहता स्वतंत्रपणे निर्णय घ्यावेत,” असे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच, “फेडरल रिझर्व्हच्या इतिहासातील सर्वोत्तम अध्यक्षांपैकी एक म्हणून त्यांची नोंद होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.