Pimpri : केतकी बहिरटचा बीज राखीद्वारे पर्यावरण संदेश

पिंपरी : अंगारकी चतुर्थी निमित्त शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी केतकी बहिरट हिने पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संदेश देत सोळा प्रकारच्या बियांपासून तयार केलेली ‘बीज राखी’ गणरायाला अर्पण केली.
या राखीत मध्यभागी कापसाचे बोंड ठेवून त्याला सर्वोच्च स्थान दिले गेले. इतर बियांमध्ये सुपारी, कॉसमॉस, घोसाळ, कारलं, सातू, साली, मका, दुधी भोपळा, काशी भोपळा, गुंजा, करडई, लाल आंबाडी, लाल हादगा आणि टरबूज या बियांचा समावेश होता. ही राखी पेंटोनिक, कोगेटेड शीट व रंगीत लोकर यांच्या सहाय्याने आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली. मागील वर्षीही केतकीने फुलांची राखी तयार करून वेगळा पर्यावरणपूरक संदेश दिला होता.
पर्यावरणपूरक उपक्रमाद्वारे धार्मिक सण साजरे करताना निसर्गाचे जतन करण्याचा आदर्श केतकीने घालून दिला आहे. शाळा व परिसरातील नागरिकांकडून तिच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.





