रांजणगाव गणपती, -केसनंद ते चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथे आता पीएमपीएमएल बस धावणार आहे. त्यामुळे पुणे शहर, उपनगरांमधील पर्यटकांना तर चिंचोली मोराची, वरुडे, गणेगाव खालसा, बुरुंजवाडी येथील नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे.
या कामासाठी चिंचोली मोराची ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अशोक गोरडे, वरुडे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कानिफ भरणे, गणेगावच्या वतीने सरपंच मंदा ढसाळ तर बुरुंजवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नानासाहेब रुके यांनी तसेच चिंचोली मोराची येथील पीएमपीएमएल सेवेत असलेले विलास धुमाळ यांनी पुढाकार घेतला होता.
याबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. या पत्र व्यवहाराची दखल घेत पीएमपीएमएल प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींशी पत्र व्यवहार करुन लवकरात-लवकर वाघोली (केसनंद फाटा) ते चिंचोली मोराची अशी बस सेवा सुरु करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.