कोची : कॉंग्रेस पक्षाच्या केरळ शाखेकडून बिहारची बिडीशी तुलना करणाऱ्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पक्षाने पोस्ट हटवली आणि जाहीरपणे माफी मागितली. या पोस्टवरील वादाच्या पार्श्वभूमीवर, केरळ पक्ष युनिटचे सोशल मीडिया प्रमुख व्हीटी बलराम यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. केपीसीसी अध्यक्ष सनी जोसेफ यांनी कबूल केले की पक्षाच्या राज्य युनिटच्या सोशल मीडिया हँडलवर बिडी आणि बिहार असा टोमणा मारताना चूक झाली आणि योग्य काळजी घेण्यात आली नाही. राज्यांच्या राजकीय नेत्यांनी केलेल्या टीकेनंतर व्हीटी बलराम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अलिकडेच जाहीर झालेल्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) बदलांच्या संदर्भात केपीसीसीच्या अधिकृत हँडल एक्सवरील बिहारची बिडीशी तुलना करणारी पोस्ट व्हायरल झाली होती. बिडी आणि बिहार दोघेही बी ने सुरू होतात. आता ते पाप मानले जाऊ शकत नाही असे या पोस्टमध्ये म्हटले होते. जीएसटी कौन्सिलने बिडीवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के कमी करून सिगारेटवरील कर वाढवण्याच्या निर्णयाचा संदर्भ देत दिलेले हे विधान बिहार आणि तेथील लोकांचा अपमान करणारे असल्याची टीका झाली होती. बिहार हे देशातील प्रमुख बिडी उत्पादन केंद्रांपैकी एक आहे आणि या उद्योगात देशभरातील सुमारे ७० लाख कामगार काम करतात. ही पोस्ट प्रकाशित झाल्यानंतर काही तासांतच सर्व राजकीय पक्षांनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केली. बिहारमधील सत्ताधारी एनडीएच्या नेत्यांनी काँग्रेसवर राज्याचा अपमान केल्याचा आरोप केला, तर काँग्रेसचा मित्रपक्ष आरजेडीने या टिप्पणीपासून स्वतःला दूर ठेवले. केपीसीसी अध्यक्ष सनी जोसेफ यांनी एका मुलाखतीत चूक मान्य केली आणि म्हटले की, पक्षाच्या सोशल मीडिया टीमने प्लॅटफॉर्म एक्सवर ही टिप्पणी प्रकाशित करताना दक्षता बाळगली गेली नाही. सनी जोसेफ यांनी एका टीव्ही चॅनेलला सांगितले की, ही पोस्ट काढून टाकण्यात आली आहे. जबाबदार व्यक्तींनी माफी मागितली आहे आणि काँग्रेस त्याचे समर्थन करत नाही.