केरळचे केरलम करण्याचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने संमत

कोची : केरळ राज्याचे केरलम असे नामकरण करण्याचा प्रस्ताव जवळपास एक वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेत मंजुर झाला होता. सर्वसंमतीने त्यावेळी मंजुर झालेला हा प्रस्ताव आज पुन्हा काही किरकोळ दुरूस्तींसह मंजुर करण्यात आला. जुन्या प्रस्तावाला केंद्र सरकारने काही दुरूस्त्या सूचवत परत पाठवले होते. त्यानुसार आता बदल करत नवा प्रस्ताव पुन्हा सर्वसंमतीने मंजुर करण्यात आला.
संविधानाच्या पहिल्या अनुसूचित केरळचे नाव अधिकृतपणे बदलून केरलम करण्यासाठी कलम ३ अंतर्गत योग्य पाऊले उचलली जावीत अशी मागणी आज हा प्रस्ताव सादर करताना केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी केली. आययुएमएलचे सदस्य शमसुद्दीन यांनी नव्या प्रस्तावात एक दुरूस्ती सूचवली होती. मात्र ती अमान्य करत फेटाळण्यात आली.
आज आपल्या प्रस्तावात मुख्यमंत्री विजयन म्हणाले की मल्याळम मध्ये केरलम नावाचा उल्लेख करणे सामान्य बाब आहे. मात्र अधिकृतपणे सरकारी दप्तरात राज्याचा उल्लेख केरळ असा केला जातो आहे. त्यामुळेच सगळीकडे केरलम असे नाव यावे यासाठी हा प्रस्ताव आणला गेला. मल्याळी भाषिक समुदायांसाठी एकीकृत केरळ बनवण्याच्या मागणी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळीच स्पष्टपणे समोर आली होती असेही विजयन म्हणाले.



