बहुतेक वृत्तवाहिन्यांच्या “एक्झिट पोल’चा अंदाज
नवी दिल्ली : दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये आम आदमी पार्टीला किमान52 जागा मिळतील आणि राज्याच्या विधानसभेमध्ये बहुमत मिळवण्याची या पक्षाची हॅटट्रीक होईल, असे भाकित बहुतेक प्रमुख वृत्तवाहिन्यांनी केलेल्या “एक्झिट पोल’मध्ये वर्तवण्यात आले आहे. भाजपाला दिल्लीच्या 70 पैकी 17 आणि कॉंग्रेसला केवळ एक जागा जिंकेल, असेही एकूण सहा एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
“टाईम्स नाऊ’ने आपसाठी 44 आणि भाजपसाठी 26 जागांचा अंदाज वर्तविला आहे. “न्यूज एक्स-नेटा’ने आपला 53 ते 57 आणि भाजपासाठी 11 ते 17 जागांचा अंदाज वर्तविला आहे. रिपब्लिक टीव्ही-जन की बातने “आप’ला 48 ते 61 आणि भाजपाला 9 ते 21 जागा दरम्यान जागांचा अंदाज वर्तवला आहे.
दिल्ली विधानसभेमध्ये लागोपाठ 3 वेळा सरकार स्थापन करणाऱ्या कॉंग्रेसला या निवडणूकीमध्ये 1 ते 3 जागा मिळतील, असा अंदाज बहुतेक वृत्तवाहिन्यांनी आपल्या “एक्झिट पोल’मध्ये व्यक्त केला आहे.
दिल्लीच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी एका पक्षाला 36 जागांचे बहुमत मिळणे आवश्यक आहे. 2015 च्या विधानसभेच्या निवडणूकीत “आप’ला 67 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर पक्षाने पोटनिवडणुकीत एक जागा गमावली. तेथे भाजपचा विजय झाला. अन्य पक्षात प्रवेश घेतल्यानंतर “आप’मधील सहा खासदारांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
भाजपने केलेला जोरदार प्रचार आणि टीकांच्या आक्रमणासमोर आम आदमी पार्टीकडेच दिल्लीचा गड राहणार असल्याचा अंदाज आहे. या आकड्यानुसार पुन्हा एकदा केजरीवाल यांची एकहाती सत्ता दिल्लीत येण्याची चिन्हे आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपने उभे केलेल्या मनोज तिवारी यांची जागा देखील धोक्यात असल्याचे या सर्व्हेत सांगण्यात आले आहे.
57 टक्के मतदान
मतदान संपत असताना दिल्लीत 57.06 टक्के इतकी नोंदविण्यात आली, असे मुख्य मतदान अधिकारी रणबीर सिंह यांनी शनिवारी सांगितले. मतदान अधिकृतपणे संध्याकाळी 6 वाजता संपले. परंतु संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करणाऱ्या मतदारांना मतदान करण्याची परवानगी होती. बऱ्याच मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदानाची वेळ समाप्त झाली तेंव्हाही काही बुथवर मतदान प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे ही टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.