नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना अटक करण्यास न्यायालयाने पोलिसांना मनाई केली. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना टॉम, डिक किंवा हॅरी असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. ती बाब विचित्र आहे, असे उपहासात्मक भाष्य राज्यसभा खासदार असणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केले.
वेगवेगळ्या प्रकरणांत अटक झाल्याने केजरीवाल आणि सोरेन सध्या तुरूंगांमध्ये आहेत. केजरीवाल यांना गुरूवारी दिल्लीतील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, त्या आदेशाला शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी सोशल मीडियावरून भाष्य केले. त्यावेळी त्यांनी येडियुरप्पा यांचा संदर्भ दिला.
येडियुरप्पा यांना पॉक्सो प्रकरणी कर्नाटक पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला मनाई केली. येडियुरप्पा पळून जाण्याची शक्यता नाही. ते कुणी टॉम, डिक किंवा हॅरी नाहीत, अशी टिप्पणी त्यावेळी न्यायालयाने केली होती.