नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर ८ आणि ९ ऑक्टोबर 2025 रोजी भारताच्या भेटीवर येणार आहेत. पंतप्रधान स्टार्मर यांचा हा पहिला अधिकृत भारत दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे मुंबईत स्वागत करणार आहेत. दोन्ही देशांचे पंतप्रधान मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटर येथे सीईओ फोरमला उपस्थित राहतील. त्यानंतर ते सहाव्या ग्लोबल फिनटेक महोत्सवात सहभागी होतील. या महोत्सवात उभय पंतप्रधानांची मुख्य भाषणेही होणार आहेत. या भेटीदरम्यान, दोन्ही नेते व्हिजन २०३५ च्या अनुषंगाने भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंच्या प्रगतीचा आढावा घेतील. व्हिजन २०३५ हा व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संरक्षण आणि सुरक्षा, हवामान आणि ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील परस्पर संबंध या प्रमुख स्तंभांशी जोडलेल्या कार्यक्रम आणि उपक्रमांचा एक केंद्रित आणि १० वर्षांचा कालबद्ध मार्गदर्शक आराखडा आहे.भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक भागीदारीचा मध्यवर्ती स्तंभ म्हणून भविष्याच्या दृष्टीने उपलब्ध झालेल्या संधींबाबदतही दोन्ही नेते उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तिमत्वांशी संवाद साधणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण होईल. याशिवाय ते उद्योग क्षेत्रातील तज्ञ, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकारांशी देखील संवाद साधणार आहेत. जागतिक फिनटेक महोत्सवामध्येही पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. जागतिक फिनटेक महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील नवोन्मेषकार, धोरणकर्ते, केंद्रीय बँकांचे प्रतिनिधी, नियामक, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे एकाच ठिकाणी येणार आहे. चांगल्या जगासाठी वित्त परिसंस्थेचे सक्षमीकरण ही या महोत्सवाची संकल्पना असून. या संकल्पनेला कृत्रिम प्रज्ञा, संवर्धित बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि समावेशकतेची जोड दिली गेली आहे. एक लाखापेक्षा जास्त जण होणार सहभागी… यंदाच्या या महोत्सवात ७५ हून अधिक देशांतील एक लाखापेक्षा जास्त जण सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. यामुळे हा महोत्सव जगातील सर्वात मोठ्या फिनटेक महोत्सवांपैकी एक ठरणार आहे. या महोत्सवात सुमारे ७,५०० कंपन्या, ८०० वक्ते, ४०० प्रदर्शक आणि भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय दोन्ही अधिकारक्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे ७० नियामक सहभागी होणार आहेत. याशिवाय सिंगापूरचे चलन प्राधिकरण, जर्मनीचे ड्यूश बुंडेसबँक , बँक दी फ्रान्स आणि स्विस वित्तीय बाजार पर्यवेक्षी प्राधिकरण यांसारख्या प्रसिद्ध नियामक आंतरराष्ट्रीय संस्थांही या महोत्सवात सहभागी होणार आहेत.