पुणे -महापालिकेत गाव समावेशानंतर संबंधित गावांची क्षेत्र असणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि सरपंच यांची पद संपुष्टात येणार आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या खडकवासला गटातून खडकवासला गावाचे महसूल क्षेत्र नसलेल्या संरक्षण विभागाच्या गिरीनगर क्षेत्रातील 300 पेक्षा अधिक मतदार ग्रामीण क्षेत्रातच असल्याने या गटातील जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे यांनी त्यांचे सदस्यत्व अबाधित ठेवावे, यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्र दिले आहे. ज्या ग्रामपंचायतींचा त्यांच्या महसुली गावांसह महापालिका क्षेत्रात समावेश झाला आहे, अशा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींना त्यांचे सध्याचे पद गमवावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर हद्द वाढीतील गावांच्या अधिसूचनेमधील महसूल क्षेत्राचा विचार करता खडकवासला जिल्हा परिषद गटातील 300 मतदार ग्रामीण क्षेत्रात कायम राहिले आहेत. त्यामुळे जयश्री पोकळे यांचे सदस्यत्व जिल्हा परिषदेची नवीन निवडणूक होईपर्यंत कायम ठेवावे. त्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाला वस्तुस्थिती अवगत करण्यासाठी पोकळे यांनी विनंती केली आहे. 1997 मध्ये ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत झाला होता. त्यावेळी देखील तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य कुमार गोसावी यांचे एनडीए क्षेत्रातील 131 मतदार ग्रामीण क्षेत्रात राहिल्याने त्यांचे सदस्यत्व अबाधित राहिले होते.