मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमध्ये अनेक नद्यांना पूर आल्याने रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली असून घर कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने खराब हवामानात केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. तसेच घोरापरव, लिंचोली, बडी लिंचोली आणि भिंबळी येथील मार्गही बंद आहे.
उत्तराखंड सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यातील बचाव कार्यात मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक चिनूक आणि एक एमआय १७ पाठविली आहे. येथील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्द्वानी येथील पुराच्या नाल्यात एक मुलगा वाहून गेला असून त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गौरीकुंड-केदारनाथ ट्रेक मार्गावरील भिंबली येथे डोंगरावरून मोठे दगड कोसळल्याने रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आतापर्यंत लिंचोली आणि भीमबली येथून हेलिकॉप्टरने ४२५ यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी आणण्यात आले आहे, तर बचाव पथकांच्या मदतीने ११०० भाविक विविध ठिकाणांहून पायी सोनप्रयागयेथे पोहोचले आहेत.





