पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील अभेद्य पुरंदरगड हे छत्रपती संभाजी राजांचे जन्मस्थळ. इंद्रनील पर्वतावर वज्रगड व पुरंदरगड हे दोन किल्ले आहेत. गडावर श्री पुरंदरेश्वर आणि श्री केदारेश्वर ही शिवमंदिरे आहेत. पूजाअर्चा व अभिषेकाची व्यवस्था शिवाजी महाराजांनी केली होती. ही मंदिरे स्वराज्याच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देत आहेत.
गडाच्या बिनीदरवाजाने गेल्यावर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पुरंदरेश्वर मंदिर आहे. कोरीव स्तंभांवर तोललेला सभामंडप आहे. त्यात दगडी नंदी आहे. येथे इंद्राची सव्वा ते दीड फूट उंचीची मूर्ती आहे. मागे रामेश्वर हे पेशवे वंशाचे खासगी मंदिर आहे. केदार दरवाजाने केदारेश्वर मंदिराकडे जाता येते. श्रावण मासात हिरव्यागार वनश्रीने हा परिसर नटलेला असतो. हिरव्या पायवाटेने चालताना मन अवतीभवतीच्या धुक्यासारखेच तरल होते. पाऊसनाद निनादत असतो. मनात केदारेश्वराच्या दर्शनाच्या ओढीने ओमकार नाद घुमत असतो.
धुक्याचा झिरझिरीत पडदा दूर होताच केदारेश्वराचे मंगल दर्शन घडते. साधेपणातील सौंदर्याची अनुभूती मिळते. मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. दगडी स्तंभांवर तोललेला प्रमाणबद्ध सभामंडप आहे. यात सुंदर दगडी नंदी आहे. गाभाऱ्यात शिवलिंगाचे दर्शन घडते. मंदिराभोवती दगडी फरसबंदी आहे. किल्ल्याच्या या अत्युच्च शिखरावरून तोरणा, कऱ्हेपठार, राजगड, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड दिसतात. झिरमिरत्या पाऊसधारांतून जणू प्रत्यक्ष कैलासपती महादेवच आशीर्वाद देत आहेत, असे वाटते.
– माधुरी शिवाजी विधाटे