Kedar Jadhav : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राज्यात आपली ताकद वाढवण्याच्या हेतूने सगळे पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. आज कधीकाळी क्रिकेटचे मैदान गाजववलेला भारताचा दिग्गज आणि मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) याने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
गेल्या वर्षी केली होती निवृत्तीची घोषणा
केदार जाधवने (Kedar Jadhav) मागच्या वर्षी जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांनी सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली होती. 39 वर्षीय केदार जाधवने त्याचा शेवटचा सामना २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यात न्यूझिलंडविरुद्ध खेळला होता.
केदार जाधवची कारकीर्द
केदार जाधवने 2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला. त्याने आपला पहिला एकदिवसीय सामना रांचीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्याने एकूण 73 एकदिवसीय सामन्यांत 42.09 च्या सरासरीने एकूण 1389 धावा केल्या. केदार जाधवने एकदीवसीय सामन्यांत दोन शतकं तसेच सहा अर्धशतकं केलेली आहेत. तसेच त्याने 27 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये केदार जाधवने 123.23 च्या सरासरीने एकूण 58 धावा केलेल्या आहेत.
केदार जाधवला काय जबाबदारी मिळणार?
केदार जाधवने भाजपात प्रवेश केला असला तरी त्याच्यावर पक्ष नेमकी कोणती जबाबदारी सोपवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आगामी काळात राजकारणाच्या आखाड्यात केदार जाधव (Kedar Jadhav) नेमकी काय भूमिका पार पाडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच त्याला क्रिकेटप्रमाणे राजकारणात यश मिळते का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





