मोदींचं टेन्शन वाढणार? केसीआर, विजयन, केजरीवाल, अखिलेश, राजा, मान एकाच व्यासपीठावर

खम्मम – जनतेला केंद्रात सत्ताबदल घडवण्याची साद घालत पाच राजकीय पक्षांनी बुधवारी भाजपविरोधात रणशिंग फुंकले. त्यासाठी निमित्त ठरले तेलंगणामधील सत्तारूढ भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) शक्तिप्रदर्शन. त्यामुळे बीआरएस, आप, सप, माकप आणि भाकप या पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्यासाठी पक्षाच्या नावात बदल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत; ‘या’ ठिकाणी होणार सभा, वाहतुक व्यवस्थेतही मोठे बदल
त्यातून आधीच्या तेलंगणा राष्ट्र समितीचे रूपांतर बीआरएसमध्ये झाले. निवडणूक आयोगाने नव्या नावाला मान्यता दिल्यानंतर बीआरएसची पहिलीच सभा तेलंगणात झाली. त्या सभेला केसीआर यांच्या निमंत्रणावरून केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि भाकपचे सरचिटणीस डी.राजा उपस्थित राहिले. त्या नेत्यांनी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज अधोरेखित करत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
BJP vs TMC : भाजपवाले बोलतात एक आणि करतात दुसरंच – ममता बॅनर्जी
केसीआर यांनी मोदी सरकारच्या धोरणांची आणि योजनांची खिल्ली उडवली. मेक इन इंडिया ही योजना जोक इन इंडिया बनली आहे. देशातील प्रत्येक रस्त्यावर चीनी बाजार दिसतात. केंद्रात बीआरएसशी संबंधित सरकार आल्यास देशातील शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवली जाईल. त्याशिवाय, संरक्षण दलांमधील भरतीसाठीची अग्निपथ योजना रद्द केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. केंद्रातील भाजपच्या राजवटीविरोधात संघर्षाचे नवे पाऊल उचलण्याचे आवाहन माकप नेते विजयन यांनी केले.
देशाला आता बदल हवा आहे. केंद्रातील सध्याचे सत्ताधारी देश बदलवण्यासाठी नव्हे; तर देशाला अधोगतीकडे नेण्यासाठी आले असल्याचे जनतेच्या ध्यानी आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात बदल घडवण्याची संधी जनतेला मिळणार आहे, असे आपचे प्रमुख केजरीवाल यांनी म्हटले. भाजपने आता स्वत:चे दिवस मोजणे सुरू केले आहे.
सध्याचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर तो पक्ष एक अधिक दिवसही केंद्रात सत्तेवर राहू शकणार नाही, अशी शाब्दिक टोलेबाजी अखिलेश यांनी केली. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी केवळ 400 दिवस उरले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत म्हटले. त्याचा संदर्भ अखिलेश यांनी घेतला. भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन राजा यांनी केले.





