भवानीनगर – काटेवाडी व कण्हेरी भागात बिबट्याने शुक्रवारी रात्री एका कुत्र्यावर हल्ला केला. या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागानेही पायांच्या ठशांची पाहणी करून हे ठसे बिबट्याचे असल्याचे सांगितले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काटेवाडी (ता. बारामती) येथील विश्वनाथ जाधव यांची शेती काटेवाडी-कण्हेरी भागात आहे. याठिकाणी त्यांचा गोठा आहे. या ठिकाणी जाळी मारण्यात आलेली आहे. ही जाळी खालून उचकटून आत शिरून बिबट्याने येथील कुत्र्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार मारून खाण्याचा प्रयत्न केला आहे.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर बारामती वन विभागाशी संपर्क साधला असता येथील अधिकारी वन परिक्षेत्र मंडळ अधिकारी त्रिंबक जराड, वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती गौरीशंकर सुपेकर, वनरक्षक मीनाक्षी गुरव, पिंपळी नर्सरी वनरक्षक संध्या कांबळे, ग्रामस्थ दिलीप जाधव, शीतल काटे, धीरज घुले, सचिन जाधव, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे दाखल झाले. त्यांनी तेथील ठशांची तपासणी केली असता त्यांना हे ठसे बिबट्याच्या पायाचे असल्याचे सांगितले. त्यामुळे बिबट्या काटेवाडी-कण्हेरी भागात वावरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, काटेवाडी-कण्हेरी भागात शेतामध्ये बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. त्याठिकाणी उमटलेले पंजांच्या ठशांची पाहणी केली असता हे ठसे बिबट्याच्या पायांचे ठसे असल्याचे बारामती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
आहे.