कातरखटाव : कातरखटाव येथील कात्रेश्वराचा रथोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. रथोत्सवास आलेल्या भाविकांनी केलेल्या “हर हर महादेव’च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दुपारी पावणेबाराच्या सुमारास कदम महाराज व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ
वाढवून रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी रथ पेठेतून जानाई मंदिरापर्यत जाऊन परत कात्रेश्वर मंदिराकडे आल्यानंतर रथोत्सवाची सांगता झाली.
रथावर सुमारे 4 लाख 93 हजार रुपये भाविकांनी अर्पण केले.
रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो स्टॉल धारकांनी हजेरी लावली होती. त्यात टोलेजंग व लहान पाळणे, खेळणी, घसरगुंडी, मिठाईची दुकानाचा समावेश होता. रथोत्सवानंतर भाविकांना व यात्रेकरुना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कातरखटाव परिसरातील व गावातील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. चालू वर्षी 4 लाख 93 हजार 950 रुपये भाविकांनी रथावर अर्पण केले. मागील वर्षापेक्षा या वर्षी 51 हजार रुपयांची वाढ देणगीत झाली आहे.
यात्रा काळात श्वान शर्यती, चित्रकला स्पर्धा, मिनी मेरेथोन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
होते.
गुलालाची उधळण करीत घोडे, बॅंड बाजा, ढोल ताशाच्या सुरात कात्रेश्वर देवाची मिरवणूक निघाली. परिसरातील भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी रथावर पैशाचे, नारळाचे तोरण अर्पण केले. पेठेतील महिलानी व युवतींनी रथाच्या स्वागतासाठी दारात रांगोळ्या काढल्या होत्या. पाहुण्याना व चाकरमान्यांना मिरवणुकीत नाचणाऱ्या मोर – घोडी आकर्षण ठरले.