कात्रज, – “गोबर से समृद्धी’ या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचे व पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) बायोगॅस स्लरी प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते तसेच एनडीडीबीचे अध्यक्ष मिनेश शाह यांच्या उपस्थितीत पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे ऑनलाइन पद्धतीने झाले.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) व एनडीडीबी मृदा लिमिटेड यांचे “गोबर से समृद्धी’ या कार्यक्रमा अंतर्गत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन टप्यात 10 हजार बायोगॅस संयंत्र उभारण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील सुमारे एक हजार बायोगॅस संयंत्राचे कामकाज पूर्ण झाले आहे.
गॅस संयंत्रातून बाहेर पडणाऱ्या स्लरीवर प्रक्रिया करुन त्यापासून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प देखील अवसरी दूध शितकरण केंद्र येथे उभारण्यात आला आहे, असे कात्रज डेअरी प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रास्ताविक एनडीडीबीचे महाप्रबंधक अनिल हातेकर यांनी केले. यावेळी मिनेश शाह, कोल्हापूर दूध संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील, केशरताई पवार, रुपाली बुट्टे पाटील, अश्विनी बुट्टे पाटील, गितांजली पाटील, नंदा जोगोजे आदी उपस्थित होते.