– जयंत माईणकर विरोधकांकडून पंतप्रधानपदाची ऑफर, व्यापारी राजा आणि सहनशील राजा अशा प्रकारच्या उपमा वापरल्यामुळे नितीन गडकरी राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. ‘मला विरोधी पक्षाकडून पंतप्रधान बनण्याची ऑफर होती’, ‘ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी!’ आणि ‘राजाकडे सहनशक्ती हवी’, गेल्या आठवड्यात ही तीन विधाने करून राजकीय खळबळ माजवून देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मनात काय आहे, हा प्रश्न पडतो. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करत त्यांनी केलेल्या अशा विधानांचं फलित त्यांना आणि भाजपला काय मिळणार, हाही एक प्रश्न आहे. घटना 2009ची असावी! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन दिग्गज एकत्र आले होते, वाजपेयी आणि अडवाणींचा वारसदार निवडण्यासाठी! त्या तीन दिग्गजांत स्वतः अडवाणींचा समावेश होता. इतर दोघे होते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि संघाचे प्रवक्ते, पत्रकार मा. गो. वैद्य. तिघांच्या विचारमंथनातून समोर आलेलं नाव होत नितीन गडकरी! वाजपेयी, अडवाणी नंतर नितीन गडकरीच! गडकरी तेव्हा महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते. प्रत्येक भाषणात केवळ मुंबई-पुणे रस्त्याचा उल्लेख असायचा. कारण त्यानंतरच ते राज्याच्या राजकारण वजनदार बनले होते. प्रमोद महाजनांच्या हत्येनंतर राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्रीय चेहरा म्हणून वैद्यांनी निवड केली गडकरींची! एक प्रकारे गडकरींना राष्ट्रीय राजकारणात आणण्याचं श्रेय जातं वैद्यांना. 67 वर्षे वयाचे गडकरींचे मोदींशी कधीच जमलं नाही. पण अध्यक्ष झाल्यापासून संघातील प्रबळ मराठी लॉबीच्या भरवशावर पंतप्रधानपदाची स्वप्न गडकरींना पडू लागली होती. तरुण भारतचे माजी संपादक मा. गो. वैद्य यांनी आपल्या स्तंभातून खुलेआम मोदींना विरोध करत गडकरींना पाठिंबा दिला होता. गडकरी वैद्यांच्याच पाठिंब्यामुळे लालकृष्ण अडवाणींची इच्छा नसताना अध्यक्ष बनले होते. अटल-आडवाणी युग संपत येत होत. संघातील मोहन भागवत, मा. गो. वैद्य यांच्यापासून अगदी नागपूरच्याच संजय जोशींपर्यंत पसरलेल्या संघातील पॉवरफुल ब्राह्मण मराठी लॉबीच्या भरवशावर गडकरी वाजपेयींची जागा घेण्याची स्वप्न पाहू लागले. वक्तृत्व आणि वाढत चाललेल्या आर्थिक पाठबळाच्या भरवशावर! याच दरम्यान पक्षाध्यक्ष म्हणून ते एकदा गुजरातच्या दौर्यावर गेले होते. पण तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींनी गडकरींना भेटणं टाळलं होतं. मोदी-गडकरींचा तो पहिला संघर्ष होता. पण त्यावेळी गडकरींनी मोदींवर कुठलीही टीका करणं टाळलं होतं. मोदी सरकारी कामात व्यस्त असल्याने ते आपल्याला भेटू शकले नाहीत, असं सांगून त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण गडकरी नेहमी बचावात्मक राजकारण खेळतात. आक्रमकता त्यांच्यात नाही आणि म्हणूनच मोदींची निवड पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून झाल्यानंतर गडकरी मोदींच्या स्वागतासाठी हातात मोत्यांची माळ घेऊन गेले होते. मध्यंतरी गडकरींनी दिलेले सर्व कॉन्ट्रॅक्टस रद्द केले जाण्याचीही बातमी आली होती. पण गडकरींनी त्यावर वादंग होऊ दिलं नाही. 2017 मध्ये लालकृष्ण आडवाणी राष्ट्रपती पदाचे उमेदवार असावेत असंही एकदा गडकरी म्हणाले होते. पण नंतर ते शांत बसले. मोदींसमोर गडकरी गेली साडेदहा वर्षे बचावात्मक राजकारण खेळत आहेत, आपलं मंत्रिपद सांभाळून! मोदींना कुठेही आव्हान देण्याचा ते प्रयत्न करत नाहीत. भाजपमध्ये सर्वोच्च नेतृत्वाला आव्हान देणार्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते याची कल्पना त्यांना आहे. त्यांच्यासमोर बलराज मधोक, गोविंदाचार्य, संजय जोशी, प्रवीण तोगडिया यांची उदाहरणे आहेत. या चौघांचं राजकीय अस्तित्वच संपुष्टात आलं. त्यातील पहिल्या दोघांनी वाजपेयींशी वैर घेतलं होतं, तर दुसर्या दोघांनी नरेंद्र मोदींशी! सदैव बचावात्मक राजकारण खेळणार्या गडकरींना या यादीत येण्याची इच्छा नाही. त्यासाठी ते प्रसंगी पडतं घ्यायला किंवा मोदींना मोत्यांची माळ भेट द्यायला तयार असतात. मग अशा अवस्थेत गेल्या आठ दिवसांत ही वादग्रस्त विधाने करण्याचं प्रयोजन काय? नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात विरोधी नेत्याचं नाव न सांगता असा दावा केला की, या नेत्याने त्यांना ‘तुम्ही पंतप्रधान होणार असाल, तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ’, अशी ऑफर दिली. या विधानावर खळबळ सुरू असतानाच गडकरींनी दुसरा बॉम्ब टाकला. ‘ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी’, असं विधान करता त्यांनी सरळ सरळ नरेंद्र मोदींना टार्गेट केलं. गडकरी एवढंच बोलून थांबले नाहीत, तर सरकार म्हणजे विषकन्या आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार असू देत ज्या कामाला हात लावतात, 99 टक्के कामं, अगदी सोन्याच्या खाणीही तोट्यात आणतात. पण पब्लिक-प्रायव्हेट व्यवस्थेनं विकासाचा दर वाढतो, नफा वाढतो, रोजगार निर्माण होतो, गरिबी कमी होते, ही मल्लिनाथी करण्यासही ते विसरले नाहीत. तर तिसर्या कार्यक्रमात ‘राजाकडे सहनशक्ती हवी’ असं म्हणत एक प्रकारे मोदींकडे विरोध ऐकण्याची सहनशक्ती नाही ही सर्वविदित असलेली वस्तुस्थिती पुन्हा मांडली! स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेण्याचा प्रकार! पण गडकरींनी लागोपाठ तीन वेळा धारदार कुर्हाडीवर पाय ठेवला. आपण कधीही पंतप्रधान बनू शकत नाही याची जाणीव झाल्यानेच गडकरी अशी विधाने करत आहेत, असं वाटतं. पंतप्रधान पदाच्या संभाव्य उमेदवारांना गृह, अर्थ, परराष्ट्र, संरक्षण खातं दिलं जातं. पण गडकरींची मजल बांधकाम खात्याच्या पलीकडे जात नाही. 2027 मध्ये पंचाहत्तर वर्षे पूर्ण करणार्या राजकारण्यांनी क्रियाशील राजकारणातून निवृत्त व्हावे हा फॉम्युला वापरून मोदींना निवृत्त करून त्यांना राष्ट्रपती करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दलित, आदिवासी यांच्यापाठोपाठ भाजप ओबीसी समाजाचा राष्ट्रपती मोदींच्या रूपाने देशाला देऊ शकतो. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देशाचे पंतप्रधान बनू शकतात. कदाचित गडकरींना उपपंतप्रधान पद देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. याहून जास्त गडकरींना काही मिळू शकत नाही. राजनाथ सिंग उत्तर प्रदेशचे ठाकूर! सध्या मोदींच्या अनुपस्थितीत त्यांच्याच अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होत असते. त्यामुळे अर्थात त्यांनाच संधी मिळू शकते. आणि याची जाणीव झाल्यामुळे गडकरी मनात येईल ते बोलत आहेत. त्याच्या परिणामांची पर्वा न करता! पण एक चालकानुवर्तीत असलेल्या संघ परिवारात हे फार काळ सहन केलं जाणार नाही. त्यातून ते पंगा घेत आहेत संजय जोशी यांची राजकीय कारकीर्द संपवणार्या मोदींशी! त्यामुळे त्यांची विधाने फार काळ ऐकून घेतली जातील असं वाटत नाही. मोदींच्या कारवाईचा बळी गडकरी ठरू शकतात. अशा वेळी मराठी प्रचारकांचं प्राबल्य असलेला संघ परिवार आणि सरसंघचालक गडकरींना वाचवू शकतील असं वाटत नाही.