कासचा फुलोत्सव बुधवारपासून खुला

ठोसेघर – कास पुष्प पठारावरील दुर्मिळ प्रजातींच्या रंगीबेरंगी फुलांचा उत्सव पर्यटकांसाठी बुधवार, दि. 25 पासून खुला होणार आहे. वन विभाग व कास पठार कार्यकारी समिती सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कास पठार पर्यटकांसाठी काही अटी व शर्तींसह खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत कास पठार कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी मारुती विष्णू चिकणे तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय सीताराम किर्दत यांची निवड करण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, जावळीचे वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, सातारचे वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, वनरक्षक नीलेश राजपूत, स्नेहल शिंगारे उपस्थित होत्या.
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यानचा फुलांचा हंगाम म्हणजे निसर्गप्रेमींसाठी अनोखी पर्वणी असते. या हंगामात देशविदेशातील हजारो पर्यटक पठाराला भेट देतात; परंतु कोविडच्या संकटामुळे गेल्या वर्षी कास पठारावरील निसर्गाचा दुर्मिळ आविष्कार पर्यटकांना अनुभवता आला नव्हता.
आता राज्यात कोविड निर्बंधांमधून सूट देण्यात येत असताना, सातारा जिल्ह्यात पर्यटनाबाबत ठोस निर्णय कधी घेतला जाणार, याची उत्सुकता निसर्गप्रेमी, वनसमित्यांचे सदस्य, व्यावसायिक व पर्यटनाशी निगडीत इतर घटकांमध्ये होती. याबाबत काल (दि. 18) निर्णय घेण्यात आल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कास पठारावरील फुलोत्सवाचा आनंद घेताना पर्यटकांना मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करावे लागणार आहे. पठारावर प्रवेशासाठी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य असून, रोज तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. पाच वर्षांखालील बालके वगळता इतरांना प्रत्येकी शंभर रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येईल.





