Kashmiri terrorist – पश्चिम बंगालमध्ये रविवारी एका काश्मिरी दहशतवाद्याला अटक करण्यात आली. बंगाल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी ती संयुक्त कारवाई केली. जावेद मुंशी असे सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो तहरिक-ए-मुजाहिदीन या काश्मीर खोऱ्यात सक्रिय असणाऱ्या संघटनेचा सदस्य असल्याचे समजते. त्या संघटनेवर पाकिस्तानातून नियंत्रण ठेवले जाते. तहरिकचे काश्मीर खोरे, पाकिस्तान आणि बांगलादेशातील दहशतवादी संघटनांशी लागेबांधे आहेत. काश्मीर खोऱ्यातील देशविघातक कारवायांमध्ये सामील असल्याचा जावेदवर आरोप आहे. त्यावरून दीर्घ काळापासून जम्मू-काश्मीर पोलिसांना तो हवा होता. नुकताच तो नेपाळला जाऊन आला. पुढील काळात बांगलादेश, पाकिस्तानला जाण्याचे त्याचे मनसुबे होते. मात्र, त्याआधीच त्याला बंगालमध्ये पकडण्यात आले. त्याच्याकडे जिहादी सामग्री आढळली. तहरिकमध्ये तरूणांची भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. व्यक्तिगत कारणासाठी नातलगाला भेटण्याच्या उद्देशातून बंगालमध्ये आल्याची माहिती त्याने प्राथमिक चौकशीवेळी दिली. तहरिकचे नापाक कारनामे जाणून घेण्यासाठी जावेदची विविध यंत्रणांकडून कसून चौकशी केली जाणार आहे.