काश्‍मीरची हवा बदलतेय?

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काश्‍मीरमधील राजकीय रंग काहीसे बदललेले दिसून येत आहेत. या निवडणुकांमध्ये दरवेळी मतदारांना मतदानावर बहिष्कार घाला, असे आवाहन करणारे फुटिरतावादीही दबक्‍या आवाजात मतदारांना मतदानात सहभागी होण्यास सांगत आहेत. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्‍का वाढण्याची दाट शक्‍यता आहे. फुटिरतावाद्यांची संयुक्‍त संघटना असणारी जॉईंट रजिस्टेन्स लीडरशिप ही संघटनाही या निवडणुकांवर बारकाईने नजर ठेवून आहे.

फुटिरतावादी नेते मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यास सांगण्याचे कारण म्हणजे त्यांनी मतदान केले नाही तर भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष विजयी होतील. काश्‍मिरात अनन्वित अत्याचार सहन करून बाहेर पडलेले काश्‍मिरी पंडित जम्मूसह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापित होऊन राहात आहेत. निवडणूक आयोगाच्या आकड्यांनुसार काश्‍मिरी विस्थापित मतदारांची संख्या 99143 इतकी आहे. जेव्हा मतदानाची टक्‍केवारी कमी असेल तेव्हा विस्थापितांची ही मते निर्णायक ठरणार आहेत.

काश्‍मीरमध्ये लोकसभेच्या तीनही जागांवर भारतीय जनता पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. 2018 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पंचायत निवडणुकांमध्ये काश्‍मीरच्या मुख्य राजकारणात महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांनी कलम 35 ए चा मुद्दा उपस्थित करत मतदानावर बहिष्कार टाकला होता. फुटिरतावाद्यांनी मतदारांना मतदान न करण्याचे आवाहन करूनही मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केले. आता लोकसभेच्या मैदानात हे दोन्हीही पक्ष आहेत. पाहूया मतदार काय भूमिका घेतात ते!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.