Kash Patel : काश पटेल यांना एफबीआय संचालकपदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरु

न्यूयॉर्क : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक चार्ली कर्क यांच्या हत्येचे प्रकरण हाताळण्याच्या मुद्द्यावरून एफबीआयचे संचालक काश पटेल यांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चार्ली कर्क यांची हत्या केल्याबद्दल टेलर रॉबिन्सन या २२ वर्षीय मारेकऱ्याला जरी अटक करण्यात आली असली, तरी या हत्येमागील त्याचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. तपास अधिकाऱ्यांना हा संशयित मारेकरी कोणतेही सहकार्य करत नाही आहे.
या प्रकरणाच्या तपासामध्ये समाधानकारक प्रगती न झाल्यामुळे एफबीआयचे संचालक काश पटेल यांच्या कामाची छाननी करण्यात येणार आहे. सिनेटच्या न्यायिक कमिटीसमोर त्यांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात येणार आहे. कर्क यांची हत्या आणि तपासाशी संबंधित अनेक प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय एफबीआयचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळण्यास ते सक्षम आहेत का नाही यावरही या सुनावणीदरम्यान विचार केला जाणार आहे. काश पटेल यांना एफबीआयच्या प्रमुख पदावरून हटवण्याच्या दृष्टीने ही हालचाल सुरू असल्याचे समजते आहे.
दरम्यान कर्क यांच्या हत्येचा तपास वेगाने केल्याबद्दल ट्रम्प यांनी काश पटेल यांचे कौतुक केले आहे. पण तरीही काश पटेल यांच्यावरील टीका सुरूच आहे. दरम्यान कर्क यांच्या हत्येला राजकीय रंग दिला जाऊ लागला आहे. कर्क यांची हत्या डाव्या विचारांशी संबंधित असल्याचा दावा उपाध्यक्ष जे.डी.वान्स यांनी केला आहे. तसेच उपाध्यक्षपदासाठी उमेदवार निवडीचाही रंग या प्रकरणाला दिला जाऊ लागला आहे. कर्क यांनी ट्रम्प यांना उपाध्यक्षपदासाठी आपले नाव सुचवले होते, असेही वान्स यांनी म्हटले आहे. कर्क यांच्या हत्येकडे व्यापक राजकीय षडयंत्राच्या भूमिकेतून बघितले जायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.





