पुणे –कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला ठेवणाऱ्या खासदार गिरीश बापट यांनी या पोटनिवडणुकीत जाहीर प्रचारातून माघार घेतली आहे. “प्रकृती अस्वास्थ्येतेमुळे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारातून माघार घेत आहोत’ असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला असून, बापट यांच्या माघारीने उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सायंकाळी खासदार बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच “प्रकृतीमुळे ते निवडणुकीचा प्रचारात उतरू शकत नसले, तरी निवडणुकीकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे कसबा असो किंवा चिंचवड भाजप दोन्ही ठिकाणी निवडून येईल,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. खासदार बापट हे गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. त्यातच हा मतदारसंघ बांधण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याने भाजपला या निवडणुकीत बापट यांची जनसंपर्क, कार्यकर्त्यांची फळी, निवडणूकीची गणिते जुळविण्यासाठी गरज होती. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही बापट यांची भेट घेतली होती. त्यावेळी “कसब्याची काळजी करू नका’ असे आश्वासन बापट यांनी दिले होते. मात्र, अचानक बापट यांनी प्रचारात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असतानाच बापट यांचे प्रचारात नसणे भाजपची अडचण वाढविणारी असल्याचे बोलले जात आहे. मनसे आता हिंदुत्वाच्या “ब्रॅकेट’मध्ये उमेदवार नसलेला पक्ष, कार्यकर्ता नसलेला पक्ष अशी टीका फडणवीस यांनी अनेकदा मनसेबद्दल बोलताना केली आहे. त्यामुळे कसब्यात भाजपला मनसेची गरज का भासली याबाबत फडणवीस यांना विचारले असता; “मनसे आता हिंदुत्ववादी झाले आहे आणि हिंदुत्ववादीच्या ब्रॅकेटमध्ये बसलेले सर्वच आमचे जवळचे आहेत’ असे सांगत मनसेच्या युतीबाबत फडणवीसांनी समर्थन केले. तसेच निवडणुकीत मदत घ्यावीच लागते असेही ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवडणुकीसाठी येत नसून, शिवसृष्टीच्या उद्घाटन आणि पंतप्रधान मोदी यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनासाठी येत आहेत. त्यामुळे कसबा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ते असणार नाहीत,’ असा खुलासाही फडणवीसांनी केला आहे.