पुणे – श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीचे हे 127 वे स्थापना वर्ष असून, यंदा श्रींची प्रतिष्ठापना सकाळी 11.40 या मुहुर्तावर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सत्संग फाऊंडेशनचे संस्थापक, क्रिया योगाचे गाढे अभ्यासक, शिक्षक आणि प्रसारक श्री. एम यांच्या हस्ते होणार आहे. या प्रतिष्ठापनेनंतर श्री. एम यांच्या हस्ते श्री कसबा गणपती पुरस्कार आणि भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
यंदाच्या वर्षीही श्रींची प्राणप्रतिष्ठेची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून निघणार आहे. सकाळी 8.20 वाजता मिरवणूक श्री कसबा गणपती उत्सव मंडपातून निघून लोखंडे तालीम पुढे पुणे मराठी ग्रंथालय येथील महापालिकेचे वाहनतळ येथे येईल. मूर्तीकार पार्सेकर यांच्याकडून श्रींची मूर्ती घेऊन सकाळी 9.30 वाजता मिरवणूक निघून ती कुंटे चौक त्यानंतर श्री लिंबमहाराज चौक, आप्पाबळवंत चौक, फरासखाना चौक पुढे लाल महाल चौक येथून साडेअकरा वाजता उत्सव मंडपात येईल. मिरवणुकीत नगारखाना, प्रभात बॅंड, श्रीराम ढोलताशा पथक, संघर्ष ढोलताशा पथक सहभागी होणार आहेत.
पुण्याच्या गौरवशाली परंपरेत मोलाचे योगदान दिलेल्या आणि पुण्याचा सांस्कृतिक वारसा जतन केलेल्या मान्यवरांना मंडळ दरवर्षी श्री कसबा गणपती पुरस्कार देते. तर भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार हा विधी क्षेत्रातील मोलाचे योगदान दिलेल्या ज्येष्ठ विधिज्ञास दरवर्षी देण्यात येतो.
यंदा श्री कसबा गणपती पुरस्काराने एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, पं. संजीव अभ्यंकर, कमलेश बोकील, विशाल चोरडिया, गोपाळ जोशी गुरुजी, राहुल आवारे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय निगुडकर पुरस्कार ज्येष्ठ विधिज्ञ दिलीप गणेश कर्णिक यांना देण्यात येणार आहे. कसबा गणपती मंडळ यावर्षी “गजमहाला’ची सजावट करणार आहेत.