satara | वाईतील कर्वे महाविद्यालयास बीसीए अभ्यासक्रमास मान्यता

वाई, (प्रतिनिधी)- येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महर्षी कर्वे महिला महाविद्यालयातील बीसीए अभ्यासक्रमास नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (AICTE) मान्यता प्राप्त झाली आहे.
अशी मान्यता प्राप्त झालेले वाई तालुक्यातील हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे. येत्या शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून बीसीए अभ्यासक्रमास इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर प्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा परिषदेने प्राप्त करून दिला आहे.
बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बारावीची परीक्षा दिलेल्या किंवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या २९ मे ला प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. परिषदेने विद्यार्थिनींना बीसीए या अभ्यासक्रमासाठी प्रगती शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे.
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांप्रमाणे बीसीएच्या विद्यार्थ्यांना AICTE पारख, स्वनाथ, सक्षम शिष्यवृत्ती, करियर पोर्टल, इंटर्नशीप प्रोग्राम, स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन, छात्र विश्वकर्मा पुरस्कार आदी विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, संशोधन प्रोत्साहन योजना, गुणवत्ता सुधार योजना लागू असणार आहे आणि महाविद्यालयास आयडिया लॅब, इनोव्हेशन कॉन्सिल कक्ष स्थापन करण्यास मदत मिळणार आहे.
म्हणूनच विद्यार्थिनींनी बीसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओंकार वैद्य यांनी केले आहे. महाविद्यालयास AICTE ची मान्यता मिळवण्यासाठी प्राध्यापक व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या पुणे येथील मुख्य कार्यालयातर्फे विशेष मार्गदर्शन मिळाले.





