पिंपरी | चिंचवडमध्ये करवंदाला पसंती, वाढता भाव

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड मंडईत डोंगरची काळी मैना विक्रीस आलेली दिसत आहे. तसेच जीवनसत्वांनी भरपूर असणारी करवंद घेण्यासाठी शहरातील नागरिक करवंदास पसंती दाखवत आहे. शहरात ठिकठिकाणी करवंद विक्रीस जोर चढला आहे.
चिंचवडगावातील गांधीपेठेत हातगाडीने करवंद विक्री होताना दिसत आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या कडेला विक्रेते बसल्याचे आढळून येत आहे. आरोग्यवर्धक आणि चविष्ट असल्याने नागरिकांची अधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे.
करवंद हे मार्च ते जून या महिन्यामध्ये मिळणारा हा रानमेवा आहे मात्र, तो आता मे महिन्यात विक्रीस आलेला दिसत आहे. सध्या करवंद ४० ते ५० रुपये पाव आणि प्रति किलो १६० ते १८० रु मिळत आहेत. करवंदे हे फळे दिसताच येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा मोह आवरता येत नाही. त्यामुळे पावले आपोआपच करवंच्या दिशेने वळतात.
मात्र जंगलतोड वाढल्याने काही भागात करवंद आणि जांभळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, या फळांचे उत्पादन घटले आहे. करवंद आणि जांभळे ‘क’ जीवनसत्वाचे अधिक प्रमाण असलेले करवंद मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असलेली जांभळेदेखील मोठ्या प्रमाणात जागोजागी उपलब्ध आहेत. हा रानमेवा डोक्यावर घेऊन देखील महिला, पुरुष मंडळी गलोगल्ली फिरत करवंदे घ्या, जांभळे घ्याच्या आरोळी देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.




