Karuna Munde : धनंजय मुंडेंकडे 11 मोबाइल नंबर; करुणा मुंडेंनी केली सीडीआर तपासण्याची मागणी

मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे एक-दोन नव्हे तर तब्बल 11 मोबाइल नंबर आहेत. याच नंबरवरून त्यांचे काळे कारनामे होतात. या नंबर्सचा सीडीआर तपासला तर त्यांच्या निवासस्थानी झालेल्या आवादा कंपनीच्या बैठकीचा सर्व कच्चा-चिठ्ठा बाहेर येईल, असा दावा करुणा शर्मा – मुंडे यांनी केला आहे. निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे.
या आरोपामुळे बीड जिल्ह्यात खळबळ माजली असताना करुणा शर्मा यांनी उपरोक्त दावा केला आहे. त्या म्हणाल्या, मी केव्हाही माझ्या नवऱ्याची किंवा स्वतःच्या मुलांची पाठराखण करणार नाही. धनंजय मुंडे हे दोषी आहेत, असे मी केव्हाही म्हणाले नाही. पण कदाचित ते दोषी ठरू शकतात. कारण, त्यांच्या बंगल्यावर आवादा कंपनीकडून खंडणी मागण्याची बैठक झाली होती. याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते 11 नंबर हवे असतील तर ते मी त्यांना देईन. पण त्यांनी अद्याप मला भेटण्याची वेळ दिली नाही. मी त्यांच्याकडे कितीदा वेळ मागणार? ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मला भेटण्यासाठी वेळ द्यायला हवा. मी 2022 मध्ये मुंडे यांच्या मोबाइल क्रमांकाची तक्रार दिली होती. या क्रमांकाचा सीडीआर काढण्याची मागणीही केली होती.
सर्व काळे धंदे या क्रमांकावरून होतात
तपास यंत्रणांनी या सर्व मोबाइल क्रमांकाचे व्हॉट्सएप चॅटचा तपशील व सीडीआर काढावा. सर्व गोष्टींचा तपास करावा. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते दोषी निघाले तर त्यांना शिक्षा करावी. कारण, त्यांचे सर्व काळे कारनामे हे या 11 मोबाइल क्रमांकांतून होतात. 11 मोबाइल नंबर बाळगणे छोटी गोष्ट नाही. मी त्यांची पत्नी आहे. त्यांनी याच क्रमांकांवरून माझ्याशी संवाद साधला आहे, असे त्या म्हणाल्या.





