प्रभात वृत्तसेवा आळंदी ( ज्ञानेश्वर फड ) – विठ्ठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा जाले ॥ परिसा भागवत नामा पुंडलिक । पताकासहित उठावले ॥ गंधर्व आणि देव आले सुरगण । चाललीं विमानें आळंकापुरीं ॥ लहान थोर सारे आले ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥ नामा म्हणे देवा दिसती तांतडी । जाती मज घडी युगा ऐसी ॥ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा कार्तिकी वारी सोहळ्यास आज कार्तिक वद्य अष्टमी बुधवार (दि. 12) परंपरेप्रमाणे श्री गुरू हैबतबाबा पायरी पूजनाने प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पारंपरिक रितीरिवाजात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या परिवारातर्फे हे पूजन संपन्न झाले. ऋषिकेश आरफळकर व विश्वस्त मंडळ यांनी फुलांनी सजविलेल्या पायरीचे पूजन केले. दही, दूध, मध, तूप, साखर, अत्तर आणि पुष्पहार अर्पण करून महानैवेद्य दाखविण्यात आला. या वेळी वेदमूर्ती श्रीनिवास कुलकर्णी, अमोल गांधी यांनी पूजेचे पौरोहित्य केले. पूजनानंतर उपस्थित मान्यवरांना परंपरेनुसार नारळ प्रसाद देण्यात आला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, डॉ.भावार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, राजाभाऊ चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, मंगेश आरु, राजाभाऊ चौधरी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.नरके, मा.सभापती डि.डि.भोसले, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण,ॲड.विष्णू तापकीर, संकेत वाघमारे, विठ्ठल घुंडरे, संदीप नाईकरे, प्रसाद बोराटे तसेच वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आणि भाविकांचे आळंदीकडे आगमन सुरू असून, हरिनाम गजरात संपूर्ण नगरी दुमदुमली आहे. श्री संत नामदेवराय महाराज, भक्त पुंडलिक आणि श्री पांडुरंग यांच्या पादुका दिंडीसह आज सायंकाळी आळंदीत दाखल झाल्या. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पहाटे घंटानाद, आरती, हरिपाठ आणि कीर्तनांनी धार्मिक वातावरण अधिकच भारावले. श्री गुरु हैबतबाबा यांच्या ओवरीत दिंडींची मंदिर प्रदक्षिणा, पूजा व आरती पार पडली. विश्वस्त मंडळांच्या उपस्थितीत पूजा विधी पार पडल्यानंतर आरफळकर यांच्या हस्ते नारळ प्रसाद देण्यात आला. यात्रेनिमित्त श्री ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून इंद्रायणी तीरावर तसेच आळंदीतील सर्व धर्मशाळा आणि पंचक्रोशीत कीर्तन, प्रवचन, हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. आळंदी नगरी सध्या हरिनामाच्या घोषात न्हाऊन निघत आहे. नगरपरिषदेकडून सोयीसुविधा – -८०० फिरती शौचालय -१९ पाण्याचे टँकर -शहर स्वच्छतेसाठी ३५० कर्मचारी -वारी काळात कचरा उचलण्यासाठी १५ घंटागाड्या -विविध सूचना देणारे ५५० सूचनाफलक लावले -१८० सीसीटीव्ही कॅमेरे -घातपात, संशयित हालचाली टिपण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये १२ वॉच टॉवर उभारले असून त्यावर पोलिसांचा वॉच -इंद्रायणीकाठी महिलांना कपडे बदलण्यासाठी चार चेंजिंग रूम -इंद्रायणी नदी पात्रासह नदीकाठी सातत्याने स्वच्छता करण्यासाठी २० कर्मचारी नेमले. केळगाव, चऱ्होली ग्रामपंचायतीही सरसावल्या – आळंदी लगत केळगाव आणि चऱ्होली ग्रामपंचायत हद्दीतही वारकऱ्यांची गर्दी असल्याने त्या ठिकाणी दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी ठिकठिकाणी दिवाबत्तीची सोय केली आहे. यामध्ये केळगाव ग्रामपंचायतीने सिद्धबेट परिसर, आळंदी-केळगाव रस्ता भागात दिवाबत्ती आणि स्वच्छतेची कामे पूर्ण केली आहेत. चऱ्होली ग्रामपंचायत माध्यमातून वारकऱ्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करणे, पाण्यात शुद्धीकरणासाठी टीसीएल टाकणे, धुरळणी करणे, कचरा उचलणे, कामांची तयारी केली.