Kartik Aaryan: ‘तू मेरी मै तेरा…’ चित्रपट अपयशी ठरल्यानंतर कार्तिक आर्यनने निर्मात्यांना १५ कोटी रुपये परत केले

Kartik Aaryan: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा ‘तू मेरी मै तेरा मै तेरा तू मेरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. हा चित्रपट करण जोहर यांच्या निर्मितीचा होता.
चित्रपटाच्या अपयशानंतर कार्तिक आर्यनने एक महत्त्वाचा आणि जबाबदारीचा निर्णय घेतला. ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच कार्तिकने त्याच्या मानधनातील १५ कोटी रुपये कमी करण्याची तयारी दर्शवली. म्हणजेच, त्याने निर्मात्यांना १५ कोटी रुपये परत दिले.
या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर विद्वंस यांनी केलं होतं. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होती. हा एक रोमँटिक चित्रपट होता, पण तरीही तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.
इंडस्ट्रीतील काही लोकांच्या मते, चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी काही अंशी कलाकारांवरही येते. त्यामुळे कार्तिकने घेतलेलं हे पाऊल योग्य आणि आवश्यक असल्याचं मानलं जात आहे. तसेच, कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातील संबंध सकारात्मक असल्याचंही सांगितलं जात आहे. याचं उदाहरण म्हणजे सध्या कार्तिक करण जोहरच्या आगामी ‘नागझिल्हा’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
कार्तिक आर्यनने यापूर्वीही चित्रपट अपयशी ठरल्यानंतर निर्मात्यांना आर्थिक मदत केली आहे. एका मुलाखतीत कार्तिकने सांगितलं होतं, “मी निर्माता नाही, पण चित्रपट आर्थिक अडचणीत होता. त्यामुळे मी माझं पूर्ण मानधन घेतलं नव्हतं. चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि आर्थिक गणितं सांभाळता यावीत म्हणून मी माझ्याकडचे काही पैसे दिले होते.”
या निर्णयामुळे कार्तिक आर्यनच्या जबाबदारीची आणि व्यावसायिक प्रामाणिकपणाची इंडस्ट्रीत चर्चा होत आहे.





