Satara | रोजंदारी करणार्या कार्तिकची क्रिकेटमध्ये आकाशाला गवसणी

दहिवडी, (प्रतिनिधी) – प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अडचणींवर मात करून, इच्छित ध्येयापर्यंत पोहोचता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दहिवडी येथील कार्तिक बाबर. रोजंदारी करून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न बाळगलेल्या कार्तिकची इलेव्हन ऑल इंडिया नॅशनल गोवा गोल्ड कप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
माण तालुक्यात दुष्काळ असला, तरी बुद्धी आणि कर्तृत्वाचा सुकाळ आहे. या मातीत अनेक रत्न जन्माला आली आहेत.
कार्तिक बाबर हा त्यापैकी एक आहे. कार्तिकचे मूळ गाव चिलारवाडी असून, या गावात बाबर कुटुंबाकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी गाव सोडले आणि ते कुटुंबासमवेत दहिवडीत आले. क्रिकेट हा कार्तिकचा लहानपणापासून आवडीचा खेळ होता.
इयत्ता चौथीपासून कार्तिकने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वडील मजुरी करत असल्याने, स्वतःची बॅट घेण्याइतपत पैसे कार्तिकजवळ नव्हते. त्यामुळे मित्रांचे खेळून झाले की, त्यांचे साहित्य तात्पुरते वापरत, कार्तिकने सराव सुरू ठेवला.
दहावी झाल्यानंतर त्याला रोजंदारीवर जावे लागत असल्याने, क्रिकेटसाठी जास्त वेळ देता येत नव्हता, तरीही कार्तिकने वेळात वेळ काढून सराव सुरू ठेवला.
एकदा मित्राच्या मोबाइलवरून ठाणे येथे निवड चाचणी होणार असल्याचे कार्तिकला समजले. मात्र, फीचे दीड हजार रुपये त्याच्याजवळ नव्हते. त्याने दिवसरात्र काम करून, चाचणीचा फॉर्म भरला. या चाचणीत त्याची वायसीएम प्रीमियर लीग महाराष्ट्र टीममध्ये निवड झाली. त्यात खेळण्यासाठी नऊ हजार रुपये टूर फी भरावी लागणार होती. शेवटच्या तारखेपर्यंत फी भरता न आल्याने ती संधी गमवावी लागली.
मात्र, त्याने जिद्द न सोडता प्रयत्न सुरू ठेवले. यावर्षी 27 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील निवड चाचणी मोफत होणार असल्याचे समजले. कोणत्याही परिस्थितीत ही संधी सोडायची नाही, या निर्धाराने तो 26 मे रोजी छत्रपती संभाजीनगरला निघाला. बसमध्ये रात्रभर उभा राहून प्रवास करून, तो निवड चाचणीसाठी दाखल झाला.
या चाचणीत उत्तम प्रदर्शन करून, तो घरी परतला. त्यानंतर 30 मे रोजी त्याची इलेव्हन ऑल इंडिया नॅशनल गोवा गोल्ड कपसाठी निवड झाल्याचे पत्र त्याला मिळाले.
ही स्पर्धा दि. 21 ते दि. 25 ऑक्टोबर या दरम्यान मडगाव येथे होणार आहेत. घरात अठरा विश्वे दारिद्य्र असतानाही, इथपर्यंत पोहोचलेल्या कार्तिकचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.





