आळंदी -तीर्थक्षेत्र आळंदीत करोनाचा कहर सुरू असून दररोज रुग्ण आढळत आहे. गेल्या 24 तासांत 12 जणांना लागण झाली आहे. तर आतापर्यंत 150 पेक्षा अधिक जणांना करोना झाला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही नागरिक तसेच प्रशासन याकडे गंभीरने पाहत नसल्याने व उपाययोनात कमी पडत असल्याने करोनाचा फैलाव रोखणार तरी कसा, आणि नगरपालिका करते तरी काय? असा सवाल संतप्त आळंदीकरांनी उपस्थित केला आहे. आळंदीत दिवसेंदिव रुग्ण संख्या वाढत असूनही नगरपरिषद सत्ताधारी असणाऱ्या भाजपचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय या शासकीय पातळीवरील असणाऱ्या संस्था उपाययोना राबवण्यात कमी पडत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपालिका फक्त कर गोळा करण्यासाठीच आहे का, की नागरिकांचा मृत्यू झाल्यावर जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर म्हणल्या की, घरोघरी जावून रुग्णांची विचारपूस करणे घरटी शिक्षकांमार्फत तपासणी करणे व डॉक्टरांना तशा सूचना दिलेल्या आहेत. रुग्णाची तपासणी करावी अडवणूक करू नये. गल्लीबोळात औषध फवारणी सुरू आहे. स्वच्छतागृहे नियमित साफ केली जात आहेत. दोन दिवसांपूर्वीच खेडचे प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांनी शहराची पाहणी करून उपाययोजनाबाबत आढावा घेतल्याचे त्यांनी नमूद केले. “ते’ चमकोगिरीतच मश्गूल थोडीफार मदत केल्यावर फोटो काढून ते सोशल मीडियाद्वारे व्हायरल करून आम्हीअमूक अमूक मदत केल्याच्या चमकोगिरीत पुढारी, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्यस्त असून त्यांना सामन्यांचे काही देणेघेणे नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या वतीने करोनाग्रस्तांसाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत, इंद्रायणी नगर, देहू फाटा येथे 100 खाटांचे कोविड सेंटर नुकतेच सुरू करण्यात आले आहे; मात्र त्या ठिकाणी पुरेसे डॉक्टर्स, नर्स उपलब्ध नसल्याने बाधित झालेल्या रुग्णांना इतरत्र हलवण्याची वेळ येत आहे. त्यासंदर्भात आम्ही मंगळवारी (दि. 4) जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे लेखी मागणी केली आहे. – वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्षा, आळंदी नगरपरिषद