वॉरसॉ (पोलंड) : पोलंडच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पुराणमतवादी नेते कारोल नॉवरॉकी यांचा विजय झाला असून त्यांना ५०.८९ टक्के इतके काठावरचे मताधिक्य मिळाले आहे. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या राजधानी वॉरसॉचे महापौर राफाल ट्राझास्कोवस्की यांना ४९.११ टक्के मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत नॉवरॉकी यांची सरशी झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली फेरी दोन आठवड्यांपुर्वीच झाली होती. दोन्ही प्रमुख उमेदवारांना भरपूर पाठिंबा मिळत असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार हे तेंव्हाच स्पष्ट झाले होते. देशात नाटो आणि युरोपीय संघाच्या पूर्वेकडील गटांमध्ये जोरदार विभाजन होत असल्याचे तेंव्हाच स्पष्ट झाले होते. रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या सुरुवातीच्या मतदान कल चाचणीमध्ये ट्राझास्कोव्स्की विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून आले होते, परंतु काही तासांनंतर आलेल्या मतदान मोजणीच्या ताज्या आकडेवारीमध्ये चित्र उलटे दिसू लागले. नवीन अध्यक्ष नावरोकी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा असल्यामुळे आता देशात लोकप्रिय आणि देशहिताला प्राधान्य देणाऱ्या राजवटीची सुरुवात होणार असे दिसते आहे. ट्राझास्कोवस्की यांनी आपला पराभव मान्य केला आणि सोमवारी नॉवरॉकीचे अभिनंदन केले आणि त्यांना मतदान करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. युक्रेनचा शेजारी असलेल्या पोलंडमध्ये युक्रेनमधील लक्षावधी नागरिकांनी आश्रय घेतला आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद या निवडणुकीवर पडणे स्वाभाविक होते. नाटो आणि युरोपीय संघाला पूर्वेकडील देशांमध्ये अधिक समर्थ बनवण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली होती. मात्र या बूमिकेत जोन्ही प्रमुख उमेदवारांच्या मिनित्ताने दोन तट पडल्याचे दिसून आले.