Kolhapur News : कोल्हापुरात कर्नाटकच्या एसटीची तोडफोड; इचलकरंजीतील हुलगेश्वरी रोडवरील घटना

कोल्हापूर : शहरात कर्नाटकाच्या एसटी बसची तोडफोड करण्यात आली आहे. इचलकरंजीमध्ये धुळवड खेळताना हुलगेश्वरी रोडवर ही घटना घडली. या घटनेत काही प्रवासीही जखमी झाल्याची माहिती आहे. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या बसवर हल्ला केला होता. त्यांनी बस चालकाच्या तोंडालाही काळे फासले होते. त्याला मारहाणही केली होती.
या घटनेवर संताप व्यक्त केला जात असताना कोल्हापूरच्या इचलकरंजीत कर्नाटकच्या बसची तोडफोड करण्यात आली आहे. धुळवड खेळताना राखेचा गोळा फकून ही तोडफोड करण्यात आली. ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये अनेक प्रवासी होते. त्यापैकी काहीजण या घटनेत जखमी झालेत. नेमके किती प्रवासी जखमी झाले हे समजू शकले नाही. पण या घटनेत एसटीची काचही फुटली आहे.
या घटनेचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेत. त्यापैकी एका फोटोत बसची मागच्या बाजूची काच फुटल्याचे दिसून येत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, बसची तोडफोड करणाऱ्या तरुणांनी यावेळी एसटी, रिक्षा, कार, ट्रक आदी सात ते आठ वाहनांची तोडफोड केल्याचीही माहिती आहे. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पण त्याची पुष्टी झाली नाही. पोलिसांनी वाहनधारकांना मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.




