Bus Accident : शिवमोग्गा जिल्ह्यात एक भीषण बस अपघात घडला असून जवळपास ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलाखाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र १० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील वीरापुरा गावाजवळ घडला. संबंधित बस चन्नागिरी येथून भद्रावतीकडे जात होती. वीरापुरा येथील कागेहल्ला परिसरात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस प्रथम पुलाच्या कठड्याला धडकली आणि त्यानंतर थेट पुलाखाली कोसळली. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना तत्काळ भद्रावती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना भद्रावती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ओडिशातही भीषण बस दुर्घटना; ५ ठार, ३५ जखमी दरम्यान, ओडिशा राज्यातही अशाच प्रकारचा भीषण अपघात घडला. नयागढ जिल्ह्यातील टेकराघाट परिसरात एक खासगी बस उलटून ५ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस बेरहामपूर येथून हरी शंकर मंदिराकडे भाविकांना घेऊन जात होती. घाटातील वळणावर बस अनियंत्रित होऊन उलटल्याने ही दुर्घटना घडली.