बंगळुरू – कर्नाटक कॉंग्रेसमधील सत्तासंघर्ष संपुष्टात आल्याचे मानण्यास भाजप तयार नसल्याचे सूचित होत आहे. मुख्यमंत्रिपदाची शर्यत तीव्र बनली आहे. कॉंग्रेसचे ७ ते ८ मंत्री आणि आमदार त्या पदाच्या स्पर्धेत आहेत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांनी केला. कॉंग्रेसमधील सत्तास्पर्धेमुळे कर्नाटकमधील प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे, असा आरोपही त्यांनी केला. ब्रेकफास्ट पे चर्चा झाल्यानंतर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात समेट घडल्याचे चित्र पुढे आले. मात्र, त्यांच्यातील संघर्षविरामावर भाजपने याआधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही महिन्यांच्या टेन्शननंतर तातडीने सर्व सुरळित होणे सहजशक्य नसल्याचे भाजप आणि जेडीएस या मित्रपक्षांचे म्हणणे आहे. तूर्तास झालेला राजकीय संघर्षविराम म्हणजे वादळापुर्वीची शांतता असू शकते, असे राजकीय विश्लेषकांनाही वाटत आहे. ब्रेकफास्टवरून संभ्रम – कथित सत्तासंघर्षाच्या नाट्यावर पडदा पडून कर्नाटकमधील राजकीय संभ्रम तूर्त तरी संपुष्टात आला. त्या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी एकत्र ब्रेकफास्ट करत ऐक्याचे दर्शन घडवले. आता त्यांच्यात पुन्हा ब्रेकफास्ट पे चर्चा होणार असल्याचे समजते. मात्र, दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे ब्रेकफास्टवरूनच संभ्रम निर्माण झाला आहे. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र मागील काही दिवसांत पुढे आले. त्यातून राजकीय संभ्रमाची स्थिती उद्भवली. ती स्थिती संपुष्टात आणण्यासाठी कॉंग्रेस श्रेष्ठींनी एकमेकांशी चर्चा करण्याची सूचना सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना केली. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी न्याहारीचे निमंत्रण दिले. ते स्वीकारत शिवकुमार शनिवारी सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्या न्याहारीने दोघांमधील वाढती दरी दूर केल्याचे समोर आले. आता सिद्धरामय्या उद्या (मंगळवार) न्याहारीसाठी शिवकुमार यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. त्यामुळे पत्रकारांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांची भिन्न ठिकाणी भेट झाल्यावर पुन्हा होणार असलेल्या ब्रेकफास्ट भेटीविषयी प्रश्न विचारला. त्यावर दोघांनी दिलेली उत्तरे सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारी ठरली. त्यादिवशी (शनिवार) शिवकुमार यांनी त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी न्याहारीसाठी येण्याचे निमंत्रण मला दिले. मात्र, न्याहारीसाठी येण्याविषयी त्यांचा फोन कॉल आलेला नाही. औपचारिक निमंत्रण आल्यावर मी नक्की जाईन. मला वाटते ते मला बोलावतील, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले. शिवकुमार यांनी तर उद्याच्या ब्रेकफास्ट भेटीविषयी थेट काही बोलण्याचे टाळले. संबंधित बाब सिद्धरामय्या आणि माझ्यातील आहे. आम्ही दोघेही एकमेकांचे भाऊ असल्याप्रमाणे कार्य करत आहोत. याआधी प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे आम्ही भेटलो. तशा भेटीची कुठली गरज नव्हती. प्रसारमाध्यमे गटबाजीच्या कंड्या पिकवत आहेत, असे ते म्हणाले. शनिवारी ब्रेकफास्ट पे चर्चा झाल्यानंतरही दोन्ही नेत्यांनी कर्नाटकमधील राजकीय गोंधळाचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडण्याचा प्रयत्न केला होता.