Karnataka: भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या प्रतिमांना घातली चपलांची माळ

मंगळुरू – दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूरचा हिंदू बालेकिल्ला भाजपच्या हातून गमावल्याने निराश झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्या फोटोला चपलांचा हार घालून त्यांच्यावरील आपला संताप व्यक्त केला आहे.
पुत्तूरमधील मतदारसंघात हिंदुत्ववादी समजले जाणारे नेते अरुणकुमार पुथिला यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी येथे अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यातून भाजपचा पराभव झाला. भाजपच्या या पराभवाला सदानंद गौडा आणि प्रदेशाध्यक्ष कटील हेच जबाबदार आहेत असा आरोप येथील कार्यकर्त्यांनी केला असून या सन्माननीय नेत्यांना आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्रद्धांजली अर्पण करतो असे त्यांनी म्हटले आहे.
पुत्तूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आशा थिमप्पा गौडा यांना केवळ 37,558 मते मिळाली, तिथे भाजपचे बंडखोर उमेदवार अरुण कुमार पुथिला यांना 62,458 मते मिळाली. कॉंग्रेसचे अशोक कुमार राय हे 66,607 मते मिळवून विजयी झाले.





