- …अखेर सुरेश लाड यांच्या पाठपुराव्यास यश
- निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम नव्याने सुरू; प्रवास होणार सुखरूप
कर्जत : कर्जत चारफाटा ते पळसदरी फाटापर्यंतचा रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. त्याठिकाणी अनेकवेळा अपघातही घडले. मात्र याची तत्कालीन आमदार सुरेश लाड यांनी दखल घेत “एमएसआरडीसी’कडे पत्रव्यवहार करून रस्ता सुस्थितीत होण्यासाठी मागणी केली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याने “एमएसआरडीसी’ने रस्ता नव्याने करण्यासाठी काम हाती घेतले असून, प्रवासी वर्गांमधून समाधानाचे वातावरण असल्याने प्रवास सुखरूप होणार आहे.
2019 मध्ये “एमएसआरडीसी’ने रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटकरणाचे काम हाती घेतले होते. वेळेत रस्ताही झाला, त्याठिकाणी गाडीची वर्दळ सुरू झाली. मात्र हवे त्याप्रमाणे रस्ता बनविण्यात आला नव्हता. काही ठिकाणी रस्ता रुंद तर काही ठिकाणी अरुंद झाला तर रस्त्यामध्येच खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते, त्यामुळे नक्की हा रस्ता बनविला कसा, असा प्रश्न निर्माण झाला होता.
अखेर रस्ता सुस्थितीत होण्यासाठी आणि चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे आणि मतदारसंघातील आणि येणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होता कामे नये यासाठी सुरेश लाड यांनी “एमएसआरडीसी’कडे तब्बल दोन वर्षे पत्रव्यवहार करून सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुरव्याला अधिकारी वर्गानी दखल घेऊन हॉटेल राजकॉटेज येथील नव्याने रस्ता करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे रस्त्याचे नव्याने काम सुरू केले असता तेथे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी स्वतः जागेवर जाऊन रस्त्याची पाहणी केली. त्यांना रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे, असे ताकीद दिली.
तसेच हॉटेल ग्रीनव्ह्यू समोरील रस्ता सुस्थितीत नसल्याने वाहन झेप घेतली जाते. तर अनेकदा वाहने जागीच घसरते. त्यामुळे वाहनचालकांच्या तोल जाऊन अपघाताला आमंत्रण मिळू शकते, जीवावर बेतू शकते. म्हणून तेथील ही रस्ता झाला पाहिजे, अशी तंबी देण्यात आली.
त्याचप्रमाणे माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे शहर अध्यक्ष अमोघ कुलकर्णी यांनी चारफाट ते पळसदरीपर्यंतचा रस्ता होण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्याप्रमाणे रस्ता लवकरच बनविण्याचे लेखी पत्र एमएसआरडीसी विभागाने दिले होते. त्याप्रमाणे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच भिसेगाव आदिवासी वाडी ही रस्त्याला लागून असल्याने तेथे सुरक्षित भिंत उभारण्याची मागणी केली आहे. तीसुद्धा लवकरच सुरू होणार असल्याचे सुरेश लाड व अमोघ कुलकर्णी यांना आश्वासन दिले आहे.
या संदर्भात पुणे येथील “टीएनटी’चे ठेकेदार बेडसे यांच्याशी संपर्क साधला असता तर त्यांनी याबाबतची माहिती देण्यास नकार दिला आहे.