प्रभात वृत्तसेवा कर्जत – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मारकाकडे कर्जत नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. दि. २ जानेवारी १९४३ रोजी देशासाठी प्राण अर्पण केलेल्या या क्रांतिवीरांच्या स्मृतिदिनीही स्मारक परिसराची दयनीय अवस्था पाहायला मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी मुरबाड येथील सिद्धगड परिसरात ब्रिटिश सैन्याने गोळ्या घालून ठार केले होते. त्यांच्या बलिदानाची आठवण जपण्यासाठी कर्जत तालुक्यात स्मारक उभारण्यात आले आहे. कर्जत नगरपरिषद हद्दीतील आमराई येथील क्रीडा नगरी परिसरात काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकात व्यर्थ न हो बलिदान या संदेशाखाली भाई कोतवाल व हिराजी पाटील यांची शिल्पे उभारण्यात आली आहेत. येथे सुमारे ४० स्वातंत्र्यसैनिकांची नावे आणि एक मशाल देखील याठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी (दि. २ जानेवारी) नेरळ परिसरातील नागरिक क्रांतिवीरांना अभिवादन करत असताना, आमराई येथील स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले, कचरा साचलेला आणि अस्वच्छता पसरलेली दिसून आली. पवित्र स्मृतिदिनाच्या दिवशी तरी या ठिकाणी स्वच्छता करावी, अशी अपेक्षा हुतात्मा प्रेमींनी व्यक्त केली, मात्र नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या स्मारकावर ऑगस्ट क्रांतीदिन, हुतात्मा स्मृतिदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नियमित कार्यक्रम व स्वच्छता होत असे. मात्र अलीकडे प्रशासनाची कार्यपद्धती अकार्यक्षम ठरत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी आपल्या जबाबदाऱ्या विसरत आहेत. कधी हे कर्मचारी ठेकेदारासारखे वागतात, तर अनेक वेळा कामांमध्ये अप्रत्यक्ष सहभाग दाखवतात, ज्यामुळे वास्तविक कामावर लक्ष जात नाही, असे नागरिकांनी आरोप केले. अनेक ठिकाणी सुशोभीकरणाच्या नावाखाली उभारलेली इतर शिल्पेही अशाच अवस्थेत असल्याचे दिसून येते.हुतात्म्यांच्या स्मारकासंदर्भातील प्रशासनाचे दुर्लक्ष हे लोकांसाठी आणि इतिहासासाठी चिंतेचे आहे. जपता येत नसेल तर उभारायचेच कशाला, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. ही स्मारके फक्त दगड आणि लोखंड नसून, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदानाचे प्रतीक आहेत. त्यांचे संरक्षण व स्वच्छता राखणे हे प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, असे स्थानिकांनी सांगितले.