प्रभात वृत्तसेवा कर्जत – कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले असतानाही परिवर्तन विकास आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांनी पदभार स्वीकारला नव्हता. अखेर निवडणुकीनंतर अकराव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पा दगडे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. दुपारी साडेचारच्या सुमारास खासदार सुनील तटकरे कर्जत नगरपरिषदेत दाखल झाले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, पुंडलिक पाटील, अशोक भोपतराव, सुनील पाटील, एकनाथ धुळे, नारायण डामसे, भगवान भोईर, विलास थोरवे, तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे, संतोष बैलमारे, स्वप्नील पालकर, नितीन सावंत, मधुरा चंदन, नमिता घारे यांच्यासह नगरसेविका अंजली कडू, संतोष पाटील, सुमिता गायकवाड, महेंद्र चंदन, सुवर्णा जोशी, प्रशांत पाटील, उमेश गायकवाड, अशोक राऊत, मानसी कानिटकर, सुचिता खोत, नेहा शिंदे, कुमेश मोरे उपस्थित होते. दीपक श्रीखंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर अशोक भोपतराव यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. खासदार सुनील तटकरे यांनी, आज मनात समिश्र भावना आहेत. कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने सविस्तर बोलणे उचित नाही. मात्र कर्जतचे महत्त्व आता अधिक वाढले आहे. नवी मुंबई विमानतळ, पनवेल-कर्जत रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. नवीन रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देणे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. निवडणुकीत दिलेले शब्द नक्कीच पूर्ण केले जातील, असे आश्वासन दिले.