कर्जत-जामखेडच्या कांदा चाळींचे अनुदान मिळाले

जामखेड (प्रतिनिधी) – मागील दीड वर्षापासून रखडलेल्या कांदा चाळींचे अनुदान अखेर आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक कोटी 92 लाख रुपये जमा झाले आहेत.
राज्य सरकारच्या ‘राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत’ कर्जत व जामखेड तालुक्यांतील शेतकऱ्यांनी कांदा चाळीची उभारणी केली होती. मात्र मागील दीड वर्षांपापासून कांदा चाळींच्या अनुदानाचे भिजत घोंगडे तसेच पडले होते. अनुदान मिळण्यास विलंब झाल्याने मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आपल्या अडचणींचा पाढा आ. पवारांपुढे वाचला. शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेत आ. पवारांनी कांदा चाळीच्या रखडलेल्या अनुदानासंदर्भात थेट कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कृषी आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कर्जतचे कृषी अधिकारी दीपक सुपेकर, जामखेडचे कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींच्या प्रयत्नातून ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे.
83 शेतकऱ्यांना प्रत्येकी 87 हजार 500 रुपयांप्रमाणे 72 लाख 62 हजार 500 रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, अनुदानाची ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमाही करण्यात आले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्य व केंद्र सरकार आर्थिक संकटाचा सामना करत आहे. असे असताना महाविकास आघाडीकडून सरकारकडून शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले, तरी आ. पवार हे सततच्या पाठपुराव्याने अनेक प्रश्न मार्गी लावण्यास यशस्वी ठरले आहेत. हे अनुदान प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे.
कांदा चाळीच्या उभारणीसाठी प्रोत्साहन
उर्वरित शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदानही काही दिवसांमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मतदारसंघातील कांदा उत्पादन हे दिवसेंदिवस वाढत असून, शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी होऊ नये, हमीभाव काळात वाटेल तेंव्हा त्यांना आपला माल विकता यावा, यासाठी पुढील काळातही आणखी कांदा चाळींना प्रोत्साहन देणार असल्याचे आ. रोहित पवार यांनी सांगितले.





